श्रीनगर: जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांच्या स्थानबद्धतेच्या कालावधीत आणखी तीन महिन्यांची वाढ करण्यात आली आहे. सार्वजनिक सुरक्षा कायद्यांतर्गत त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे.
केंद्र सरकारने मागील वर्षी ऑगस्टमध्ये जम्मू-काश्मीरचा विशेष राज्याचा दर्जा रद्द केला. त्या पाऊलामुळे जम्मू-काश्मीरातील स्थिती बिघडू नये यासाठी तेथील प्रमुख नेत्यांना स्थानबद्ध करण्यात आले. त्यात मेहबुबा यांचाही समावेश होता. सुमारे आठ महिने मेहबुबा यांना दोन सरकारी निवासांमध्ये ठेवण्यात आले. त्यानंतर त्यांना मागील महिन्यापासून त्यांच्या निवासस्थानीच स्थानबद्ध करण्यात आले आहे.
चालू वर्षी फेब्रुवारीत मेहबुबा यांना आणखी काही काळासाठी स्थानबद्ध करण्यासाठी सार्वजनिक सुरक्षा कायद्यातील तरतुदींचा वापर करण्यात आला. त्याअंतर्गत मेहबुबा यांच्या स्थानबद्धतेची मुदत संपण्याच्या काही तास आधी ती पुन्हा वाढवण्यात आली. मेहबुबा यांच्याबरोबरच फारूख आणि ओमर अब्दुल्ला या माजी मुख्यमंत्री असणाऱ्या पिता-पुत्रांनाही स्थानबद्ध करण्यात आले होते. मात्र, अब्दुल्ला पिता-पूत्रांची काही दिवसांपूर्वी स्थानबद्धतेतून मुक्तता करण्यात आली.