न्हावरे – आलेगाव पागा परिसरातील होलगुंडेवस्ती, येथे शेतात उसतोड चालू असताना बिबट्याची तीन पिल्ले आढळून आली. साहेबराव कोळपे यांनी शेतात सापडलेली बिबट्याची पिल्ले वनरक्षक बी. एस. शिंदे यांच्या ताब्यात दिली. शिंदे यांनी या पिल्लांची तपासणी करून पुन्हा त्यांना शेतात सोडून दिले.
होलगुंडेवस्ती, डुबेवस्ती येथे मागील काही दिवसांपासून बिबट्याच्या हल्ल्याच्या घटना दररोज घडत आहेत. या परिसरात मागील काही दिवसांपासून ज्ञानदेव होलगंडे यांचा एक कुत्रा, अजित होलगंडे यांचा एक कुत्रा, गंगाराम वाघमोडे यांची दोन कोकरी आणि दोन करडे, भीमा होलगंडे यांची एक मेंढी, दादाभाऊ डुबे यांचा एक कुत्रा, कैलास डुबे यांचा एक कुत्रा अशाप्रकारे वरील शेतकऱ्यांच्या एकूण 9 पाळीव जनावरांवर बिबट्याने हल्ला करून त्यांचा फडशा पाडला आहे.
शिरूरचे वनपरिक्षेत्र अधिकारी मनोहर म्हसेकर यांना विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, बिबट्याची पिल्ले जिथे सापडली आहेत तिथे पिंजरा लावला आणि जर बिबट्याची मादी आणि तिच्या पिल्लांची भेट झाली नाही तर, बिबट्याची मादी अधिक आक्रमक होईल. त्यामुळे तिच्यापासून अधिक धोका संभवू शकतो.