पुणे – हडपसर- माळवाडी परिसर तसेच साडेसतरा नळी परिसरात महापालिकेकडून समान पाणी योजनेअंतर्गत सहा पाणीटाक्या उभारल्या जात आहेत. या टाक्यांना पाणीपुरवठा करण्यासाठी महापालिकेस सुमारे तीन किलोमीटरची जलवाहिनी बेबी कालव्याच्या बाजूने टाकायची आहे.
मात्र, दोन वर्षांपासून पाटबंधारे विभागाकडून ना हरकत प्रमाणपत्र (एनओसी) देण्यास टाळाटाळ केली जात असल्याचे समोर आले. ही परवानगी महापालिकेस मिळाल्यास तब्बल तीन लाख नागरिकांचा पाणीपुरवठा सुरळीत होणार आहे.
हडपसर भागासाठी चार नवीन पाणी टाक्या बांधण्यात आलेल्या असून एक जुनी पाण्याची टाकी आहे. तेथे महापालिकेकडून पाणीपुरवठा करून त्या जोडण्यासाठी सुमारे तीन ते चार किलोमीटरची जलवाहिनी टाकायची आहे. ही मुख्य जलवाहिनी असणार आहे. तिचा बहुतांश भाग जुन्या बेबी कालव्यालगत आहे.
त्यामुळे महापालिकेने जलवाहिनी टाकण्यासाठी पाटबंधारे विभागाकडे “एनओसी’ची मागणी वारंवार केली आहे. त्यानंतरही पाटबंधारे विभाग टाळाटाळ करत आहे. या भागात महापालिका सध्या जुन्या जलवाहिन्यांद्वारे पाणीपुरवठा करत आहे. मात्र, वाढलेल्या नागरीकरणास सध्या दिले जाणारे पाणी पुरेशा प्रमाणात मिळत नाही. तर या नवीन टाक्यांमुळे या भागाची पाणी समस्याच सुटणार आहे. मात्र, पाटबंधारे विभागाने आडमुठी भूमिका घेतल्याने महापालिका हतबल झाली आहे.