पिंपळे गुरव (वार्ताहर) – काशिदनगर येथे शासकीय इमारत आहे. इमारत छोटी आहे. इमारतीच्या वरील मजल्यावर जाण्यासाठी छोटा जिना आहे. अरुंद जिन्यामुळे नागरिकांना व रुग्णांना ये-जा करणे कठीण होत आहे. या इमारतीमध्ये आरोग्य विभागातील स्वच्छता कर्मचाऱ्यांचे ऑफिस आहे. तसेच पोस्ट ऑफिस, वैद्यकीय विभाग आहे. त्यामुळे या इमारतीमध्ये कर्मचारी, नागरिक व रुग्णांचा मोठ्या प्रमाणावर राबता असतो. त्यामुळे येथे नागरिकांची मोठी गर्दी होत आहे. त्यामुळे फिजिकल डिस्टन्सिंगचा फज्जा उडत आहे. त्यामुळे नागरिकांना करोनाची लागण होण्याची शक्यता आहे.
या इमारतीच्या तळमजल्यावर आरोग्य विभागाच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांचे ऑफिस आहे. त्यामुळे सकाळी येथे मोठ्या प्रमाणावर कर्मचाऱ्यांची गर्दी होते. येथे अधिकारी व कर्मचारी यांची संख्या जास्त असल्याने जागा अपुरी पडत आहे. तसेच याच इमारतीच्या आत सर्वजण दुचाकी वाहने पार्क करीत असल्याने जागा अपुरी पडत आहे. इमारतीच्या पहिल्या मजल्यावर भारतीय टपाल खात्याचे ऑफिस आहे. हे ऑफिस सकाळी दहा ते दुपारी तीन या वेळेत नागरिकांची वर्दळ पहावयास मिळते. नागरिक येथे बचत खाते, सुकन्या बचत योजना खाते, पार्सल, आदींसाठी सतत गर्दी होत असते. तसेच दुसऱ्या मजल्यावर महापालिकेचे प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. त्यामुळे परिसरातील नागरिक येथे आरोग्य तपासणी करण्यासाठी येत असतात. त्यामुळे रुग्णांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असते.
सर्दी, ताप, खोकला याची साथ आहे. तसेच करोनाची लक्षणेदेखील हीच असल्याने नागरिकांमध्ये मोठी भीती निर्माण झाली आहे. तसेच गरोदर महिला तपासणीसाठी येथे असतात. दर गुरुवारी लस घेण्यासाठी येणाऱ्या रुग्णाची संख्या जास्त प्रमाणात असल्याने येथे गर्दी होते. इमारतीतील इतर विभागात जाण्यासाठी जिना अरुंद असल्याने नागरिकांना ये-जा करताना कसरत करावी लागत आहे. त्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. तसेच स्वच्छता कर्मचारी, दवाखान्यात येणारे रुग्ण, नातेवाईक तसेच पोस्ट ऑफिसमध्ये येणाऱ्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. महापालिका प्रशासनाने याची दखल घेऊन येथील कार्यालयांचे स्थलांतर करून नागरिकांची होत असलेली गर्दी कमी करावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.
दवाखान्यासाठी जागा छोटी आहे. त्यामुळे परिसरातून येणाऱ्या रुग्णांची गैरसोय होत आहे. त्यांना बसण्यासाठी जागा नाही. त्यामुळे रुग्णांना रांगेत उभे राहवे लागत आहे. तसेच पाकिंग व्यवस्था अपुरी पडत असल्याने वाहने पार्क करणे अवघड झाले आहे.
– शांताराम माने, आरोग्य अधिकारी
जागेचा अभाव असल्याने कर्मचारी व नागरिकांना गाडी पार्क करणे कठीण झाले आहे. पोस्ट ऑफीस शाळेच्या इमारतीमध्ये शिफ्ट करण्यात येणार आहे. त्यामुळे येथे येणाऱ्या समस्या सुटणार आहे. नागरिकांची सोय होणार आहे. तेव्हा या कामाला गती देण्यात यावी.
– राहुल बने, मॅनेजर पोस्ट ऑफिस
करोनाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता
शहरात सध्या मोठ्या प्रमाणावर करोनाच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. परंतु पिंपळे गुरव परिसरातील नागरिकांना काशिदनगरमधील इमारतीत एकाच ठिकाणी तीन कार्यालये असल्याने या-ना त्या कारणाने सतत ये-जा करावी लागत आहे. त्यामुळे नागरिकांची, रुग्णांची, ज्येष्ठ नागरिकांची तसेच सफाई कर्मचारी, गरोदर महिला यांची मोठ्या प्रमाणावर वर्दळ असते. त्यामुळे फिजिकल डिस्टन्सिंगचा नियम पाळला जात नाही. नागरिक एकमेकांच्या संपर्कात येत आहेत. त्यामुळे करोनाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता वाढली आहे.
अपुऱ्या जागेमुळे जिन्यात रांगा
पोस्ट ऑफिस इमारतीच्या पहिल्या मजल्यावर तर दुसऱ्या मजल्यावर प्राथमिक आरोग्य केंद्र असल्याने दोन्ही विभागात येणाऱ्या नागरिकांची संख्या जास्त असल्याने फिजिकल डिस्टन्स पाळण्यासाठी नागरिकांच्या कार्यालयाबाहेर रांगा लावल्या जात आहेत. या रांगा जिन्यात लावल्या जात आहेत. त्यामुळे दवाखान्यातील रुग्ण व पोस्ट ऑफिसमध्ये येणारे नागरिक एकत्र येतात त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोस्ट ऑफिस दुसऱ्या ठिकाणी हलविण्याचा निर्णय झाला आहे. मात्र अद्याप हे काम मार्गी लागले नाही. त्यामुळे महापालिका प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची गरज आहे.