देहूगाव (वार्ताहर) – करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने यावर्षी पायी वारी रद्द केली. त्याला महाराष्ट्रातून वारकरी संप्रदायाने मोठा प्रतिसाद दिला. त्यामुळे आषाढीवारीसाठी संत तुकाराम महाराजांच्या पादुका वीस वारकऱ्यांसह बसने पंढरपूरकडे मंगळवारी 30 जूनला मार्गस्थ होणार आहेत. तशी परवानगी जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष यांच्या वतीने उपजिल्हाधिकारी जयश्री कटारे यांनी दिली आहे. ही परवानगी देताना जिल्ह्यातील प्रत्येक संतांच्या पादुकांबरोबर इन्सिडंट कमांडटची नेमणूक केली जाणार आहे.
श्री संत तुकाराम महाराज यांच्या पालखीसाठी महसूल विभागाचे नायब तहसीलदार संजय भोसले यांची नेमणूक केली आहे. त्यांनी संस्थानच्या विश्वस्थासोबत चर्चा करून देहू ते पंढरपूरपर्यंतचा प्रवासाचा मार्ग निश्चित करावा असे निर्देश दिले आहेत. पादुका घेऊन जाणाऱ्या बसेस रस्त्यामध्ये दर्शनासाठी कोठेही थांबणार नाहीत व 30 जूनला रात्री 11 वाजेपर्यंत पोहोचतील याची दक्षता घेण्यासंदर्भातही सूचना केल्या आहेत. पादुकांबरोबर जाणाऱ्या सर्व वारकऱ्यांनी मास्क, फिजिकल डिस्टन्सिंग आणि वेळोवेळी सॅनिटायझर वापरणे आवश्यक असल्या बाबतच्या सूचना केल्या आहेत. परवानगी देण्यात आलेल्या प्रत्येक संतांच्या पादुकांसोबत जास्तीत जास्त 20 विश्वस्थ वारकरी यांना जाता येईल. मात्र त्यासाठी त्यांचे वय 60 वर्षांपेक्षा कमी असणे आवश्यक आहे.
पादुकांसमवेत जाणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला हायपर टेन्शन, रक्तदाब, मधुमेह, अस्थमा- दमा या सारखे दुर्धर आजार नसावेत. या प्रत्येक व्यक्तीने करोना टेस्ट करून घेणे आवश्यक आहे. बसमध्ये जाणाऱ्या सर्वांनी शासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करणे आवश्यक आहे. पादुका घेऊन जाणाऱ्या बसेस सोबत पुढे व मागे पोलीस बंदोबस्त करणारी वाहने वायरलेस सह पंढरपूरपर्यंत व परतताना पंढरपूरपासून देहूपर्यंत सोबत असणार आहेत. त्याच प्रमाणे पादुकांसमवेत जाणाऱ्या सर्व वारकऱ्यांची यादी सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयास पाठविणे आवश्यक आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाने परवानगी दिल्याने यंदा पायी वारी ऐवजी श्री संत तुकाराम महाराजांच्या पादुका बसने नेल्या जाणार आहेत. संस्थानच्या वतीने वारीच्या कामाला वेग आला आहे.
वैद्यकीय तपासणी
पादुकांसमवेत पंढरपूरला जाणाऱ्या संस्थानच्या पदाधिकाऱ्यांसह सेवेकरी असे 20 जणांची देहूरोड येथे वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून, शासनाच्या सूचनेनुसार त्यांच्या सॅब संकलन केंद्रात कोविड तपासणी करण्यात आली आहे.
मार्गावर गर्दी करू नये
संत तुकोबारायांच्या पादुका (दि. 30 मंगळवारी) बसने पंढरपूरला घेऊन जाणार आहे. मात्र मार्गावर भाविकांची गर्दी होऊ नये याची दखल घेत देहूतून मार्गस्थ होताना पहाटे सकाळी, दुपारी अशी वेळ निश्चित नसल्याचेही आणि पादुकांचे पूजन करताना प्रमुख उपस्थित असणाऱ्यांची नावेही जाहीर करण्यात आली नाहीत