जाधववाडी (वार्ताहर) – मोशी येथील वाघेश्वर कॉलनीत काही प्रमाणात लघुउद्योग व लोकवस्ती आहे. ह्या ठिकाणी उच्चदाब वीजवाहक केबल टाकण्यात आली आहे. तसेच आवश्यकतेनुसार डीपी बॉक्स बसविण्यात आले आहेत. हे सर्व डीपी बॉक्स रस्त्याच्या बाजूला उभारण्यात आले आहेत. यातील बऱ्याच डीपी बॉक्सचे दरवाजांचे लॉक तुटले आहे. तर काही डीपी बॉक्स रस्त्याच्या डांबरीकरणात खालच्या बाजूने बुजले आहेत. त्यामुळे नागरिकांच्या व लहान मुलांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे.
रस्त्याचे डांबरीकरण झाल्याने काही डीपी बॉक्सची उंची वाढविणे आवश्यक आहे. ही समस्या काही लघुउद्योक कंपन्यांनी, स्थानिक नागरिकांनी नगरसेवक व महावितरण अधिकारी यांच्या कानावर घातली आहे. परंतु अद्याप ही समस्या जैसे-थेच आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू झाले आहेत. रस्त्याने वाहत येणारे पाणी डीपी बॉक्समध्ये गेले तर मोठा अनर्थ होण्याची शक्यता आहे. नागरिकांना शॉक लागण्याची भीती आहे. नागरिकांनी तक्रार केल्यानंतर महावितरणाचे अधिकारी डीपी बॉक्सची अवस्था पाहून गेले. परंतु यावर अद्याप कार्यवाही करण्यात आली नाही. वाघेश्वर चौक येथील एका डीपी बॉक्सला वाहनाची धडक बसल्याने त्याची दुर्दशा झाली आहे.
अनेक महिन्यांपासून ही समस्या आहे. परंतु याकडे ना स्थानिक लोकप्रतिनिधी लक्ष देत आहेत ना महावितरण कंपनीचे अधिकारी. यामुळे नागरिकांमध्ये महावितरणाविषयी नाराजीचा सूर आहे. या भागात जवळपास सत्तर औद्योगिक विजेचे थ्री फेज मीटर असून, लहान मोठ्या औद्योगिक कंपन्या आहेत. तरीही महावितरण जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याची खंत उद्योजक व्यक्त करीत आहेत. ही समस्या अद्याप तशीच असून, अनेकदा डीपी बॉक्स जळाले असल्याची माहिती मिळत आहे. त्वरित ही समस्या सोडवावी, अशी मागणी उद्योजक व रहिवासी करीत आहेत.
पुढील पाच ते सहा दिवसांत ह्या परिसरातील सर्व डीपी बॉक्सची उंची वाढविण्यात येईल.
– राहुल जाधव, नगरसेवक (माजी महापौर)
अनेकदा महावितरण अधिकारी येऊन जातात परंतु डीपी बॉक्सची उंची वाढवली जात नाही. नगरसेवकांना सांगूनदेखील समस्या अद्याप तशीच आहे. काल परवा एक केबल जळाली त्या वेळी लाईन मन आले होते. अनेकदा केबल चाचणी वाहन येऊन गेले. अद्याप कोणतीही सुधारणा नाही.
– सुरेश जरे, उद्योजक