पाथर्डी -पाथर्डी तालुक्यातील मोहोजदेवढे येथे पहिला करोना रुग्ण सापडल्यानंतर प्रशासन सतर्क झाले आहे. बाधित रुग्णाच्या संपर्कात आलेल्या 26 संशयितांना जिल्हा शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले आहे. त्यांच्या घशातील स्त्राव पुणे येथील लष्करी वैद्यकीय रुग्णालयात तपासणीसाठी पाठविण्यात आल्याचे आरोग्य अधिकारी डॉ. भगवान दराडे यांनी सांगितले. तसेच साथरोगाचा प्रसार रोखण्यासाठी 5 मेपर्यंत आरोग्यसुविधा वगळता संपूर्ण तालुक्यात संचारबंदी लागू करण्यात आल्याची माहिती तहसीलदार नामदेव पाटील यांनी दिली.
शनिवारी सायंकाळी जिल्हा पोलीस अधीक्षक अखिलेश कुमार सिंह यांनी पाथर्डीला धाव घेतली. शहरातील पोलीस बंदोबस्ताचा आढावा घेवून मोहोजदेवढे येथे भेट देवून, गावाकडे येणारे सर्व रस्ते सील करण्याच्या सूचना दिल्या. यावेळी प्रांताधिकारी देवदत्त केकाण, पोलीस उपविभागीय अधिकारी मंदार जवळे, तहसीलदार नामदेव पाटील, पोलीस निरीक्षक रमेश रत्नपारखे, तालुका आरोग्य डॉ. भगवान दराडे यांच्याशी विचार-विनिमय करून मोहोजदेवढे गाव रात्रीच सील करण्यात आले. 10 मे पर्यंत हे गाव पूर्णपणे बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहे. 24 तास या गावात विविध विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत.
तालुक्यात करोना रुग्ण आढळल्यानंतर आमदार मोनिका राजळे यांनी आज सकाळी तत्काळ बैठक घेऊन नियोजनाचा आढावा घेतला व रोगाचा प्रसार वाढू नये, यासाठी तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या. ग्रामीण भागात यापूर्वी फारशी खबरदारी घेतली जात नव्हती. मात्र बाधित रुग्ण आढळल्यानंतर अनेक गावांनी गावाबाहेर जाण्यासाठी व गावात नवीन व्यक्तींना येण्यासाठीचे रस्ते बंद करून मनाई केली आहे. प्रत्येक गावात सरपंचांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली असून, गावात नवीन येणाऱ्यावर समितीमार्फत करडी नजर ठेवण्यात येणार आहे.
बाधित रुग्ण सापडल्यानंतर तालुक्यात प्रशासनासह नागरिक सतर्क झाले असून, काळजी घेण्यासंदर्भात एकमेकांना सोशल मीडियावरून मेसेज पाठवले जात आहेत. काही समाजकंटकांनी पत्रकारांच्या नावाने अफवा पसरविल्याच्या घटना घडल्या आहेत.पोलिसांकडून अशांचा शोध घेतला जात आहे. पोलीस प्रशासनाकडून शहरातील मुख्य रस्त्यावर अधिक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पालिका प्रशासनाकडून नागरिकांनी घराबाहेर न पडण्याचे आवाहन करण्यात येत आहे. बाधित रुग्णाच्या संपर्कात आलेल्या 26 संशयितांचा अहवाल रविवारी रात्री किंवा सोमवारपर्यंत येणे अपेक्षित आहे. संशयितांचा अहवालानंतर तालुक्यातील करोना प्रसाराची तीव्रता स्पष्ट होणार आहे.
भाजीविक्रेत्यांवर प्रतिबंध
भाजीपाला व फळविक्रेत्यांना आता प्रतिबंध करण्यात आला आहे. या तीन दिवसांत भाजीपाला देखील कोणी विकणार नाही, अशी तंबी देण्यात आली आहे. त्याबरोबर ग्रामीण भागात गावमध्ये प्रवेश करणाऱ्यांनी आरोग्य तपासणी करूनच गावात प्रवेश करावा. अन्यथा प्रवेश करणारा व त्याला आश्रय देणाऱ्यांवर कलम 280 नुसार गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत.
37 अहवालांची प्रतीक्षा
जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या वतीने पुण्याच्या लष्करी वैद्यकीय महाविद्यालयाकडे पाठविलेल्या अहवालांपैकी 12 अहवाल निगेटिव्ह आले असून, उर्वरित 37 अहवालांची प्रतीक्षा असल्याचे जिल्हा आरोग्य यंत्रणेने सांगितले. मोहोजदेवढे येथील एक व्यक्ती बाधित असल्याचे आढळून आले होते. तसेच उर्वरित 12 अहवाल काल रात्री उशिरा प्राप्त झाले. दरम्यान, पाथर्डी तालुक्यातील या बाधित व्यक्तींच्या संपर्कातील व्यक्तींसह इतर, असे एकूण 37 व्यक्तींच्या घशातील स्त्राव नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. त्या अहवालांची अद्याप प्रतीक्षा आहे.