साकोरी, बांगरवाडी, शिंदेवाडीत घटना : गावकरी, शेतकरी सुन्न
बेल्हे – साकोरी (ता. जुन्नर) येथील मच्छिंद्र विठ्ठल साळवे यांच्या गट नंबर 842 मधील गोठ्यावर बिबट्याने मंगळवार (दि. 18) रोजी रात्री एकच्या सुमारास अचानक हल्ला केला. यात एक शेळी जागीच ठार झाली आहे. त्यापाठोपाठ बांगरवाडी, शिंदेवाडी येथे बिबट्याने हल्ले केले आहेत. त्यामुळे तीन गावांतील गावकरी, शेतकरी सुन्न झाले आहेत. बिबट्याची दहशत निर्माण झाल्यामुळे परिसरात सन्नाटा निर्माण झाला आहे.
साकोरी येथे बिबट्याने हल्ला केल्यानंतर दुसरा हल्ला बांगरवाडी येथील बाळू धोंडीभाऊ तिखोळे यांच्या मेंढीवर केला. ही रात्री दोनच्या सुमारास घडली. यात बिबट्याने मेंढी फस्त केली. अणे पठारावरील शिंदेवाडी येथे रोहिदास दारकू शिंदे यांच्या गोठ्यावर बिबट्याने रात्री एकच्या सुमारास चाल केली. यावेळी घराजवळ बांधलेल्या जर्सी कालवडीवर बिबट्याने हल्ला केल्याने कालवड जागीच ठार झाली.
शिंदेवाडी परिसरामध्ये याआधी नागरिकांनी कित्येकवेळा दिवसासुद्धा बिबट्या पाहिले आहेत. त्याच्या पाऊलखुणा शेतामध्ये नागरिकांना दिसत आहेत. बिबट्याची शिंदेवाडी परिसरामध्ये मोठी दहशत निर्माण झाली आहे. पिंजरा लावून बिबट्या जेरबंद करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते प्रशांत दाते, अणेचे माजी उपसरपंच किशोर आहेर, डॉ. दीपक आहेर यांनी केली आहे.
आदल्यादिवशी चाहूल
शिंदेवाडी येथील धनगरबेंद चौत्रावस्ती जवळील सुदाम शहाजी शिंदे यांना सोमवार (दि. 17) रोजी सकाळी साडेसातच्या सुमारास बिबट्या दिसला होता. तो बिबट्या घराच्या दिशेने येत असताना पाहून घरातील मंडळींनी आरडाओरड केला. यावेळी बिबट्याने तिथून धूम ठोकली. या भागात पिंजरा लावण्याची मागणी होत आहे. पठार भागावर वन्यप्राण्यांना खाण्यासाठी काही मिळत नसल्याने हे बिबटे मानवी वस्तीकडे धाव घेत आहेत. पठार भागावरील पाणवठेसुद्धा दिवसेंदिवस कमी होत आहेत. त्यामुळे नागरिकांना अनेकवेळा बिबट्याचे दर्शन होत आहे.