सातारा (प्रतिनिधी) – व्हॉटस्ऍपवर मैत्री करून एका युवतीने बॅंड व्यावसायिकाला ठोसेघरला फिरायला नेले. तेथे युवतीच्या कथित भावांची अचानक “एन्ट्री’ होऊन त्यांनी बॅंड व्यावसायिकाचे अपहरण केले. त्याला विविध ठिकाणी फिरवून अडीच लाखांची रोकड, पाच अंगठ्या आणि कार घेऊन पलायन केल्याची घटना 28 फेब्रुवारी 2020 रोजी उघडकीस आली होती.
याप्रकरणी सुधाकर बाबुराव गेजगे (वय 43, रा. माळवाडी, ता. बारामती) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सातारा तालुका पोलीस ठाण्यात एका युवतीसह सहा जणांवर खंडणी व अपहरणाचा गुन्हा दाखल झाला होता. तेव्हापासून फरारी असलेल्या अजिंक्य रावसाहेब नाळे, वैभव प्रकाश नाळे (रा. कऱ्हावागज, ता.बारामती) व काजल प्रदीप मुळेकर (रा. थेऊर, ता. हवेली, जि. पुणे) यांना सातारा तालुका पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने अटक केली आहे.
याबाबत माहिती अशी, सुधाकर गेजगे यांना 4 डिसेंबर 2019 रोजी व्हॉटस्ऍपवर एका युवतीचा मेसेज आला. त्या युवतीने त्यांना सातारा बसस्थानकात भेटायला बोलवले होते. गेजगे हे 6 डिसेंबर रोजी सातारा बसस्थानकात आले असता, ठोसेघरला फिरायला जाऊ, असे युवतीने सांगितले. त्यानंतर ते दोघे कारने ठोसेघरला गेले. तेथे त्या युवतीने लॉजमधील खोली बुक केली. दोघे लॉजवर थांबले असता, माझा दादा बाहेर आलाय, असे त्या युवतीने गेजगेंना सांगितले.
त्यानंतर चार जण अचानक लॉजमध्ये आले. आमच्या बहिणीसोबत काय करतोस, असे म्हणत त्यांनी गेजगेंना मारहाण केली. गेजगेंना त्यांच्याच कारमधून कोरेगावला नेले. तेथे आणखी एक युवक आला. त्यानेही गेजगेंना मारहाण केली. त्यांच्याकडून पाच अंगठ्या, दोन लाख 56 हजारांची रोकड व कार घेऊन संशयितांनी पलायन केले होते.
गेजगे यांनी भीतीपोटी या प्रकाराची वाच्यता केली नव्हती; परंतु दहिवडी परिसरात झालेल्या मारामारीनंतर संबंधित हल्लेखोर एक कार घटनास्थळी सोडून पसार झाले होते. त्या गुन्ह्याचा तपास दहिवडी पोलिस करत असताना, ती कार गेजगे यांची असल्याचे स्पष्ट झाले.
पोलिसांनी चौकशी केल्यावर, आपल्याबाबत घडलेला प्रकार त्यांनी सांगितला. त्यामुळे “हनी ट्रॅप’चा प्रकार उघड झाला होता. तेव्हापासून संशयित फरारी होते. त्यांना सातारा तालुका पोलिसांनी काल (दि. 28 फेब्रुवारी) सापळा लावून अटक केली.
पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अप्पर अधीक्षक धीरज पाटील, सहाय्यक अधीक्षक आँचल दलाल, पोलीस निरीक्षक सजन हंकारे यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार अमित पाटील, हवालदार दादा परिहार, सुजीत भोसले, सागर निकम, सतीश पवार, नीतिराज थोरात, राजेंद्र वंजारी, मालोजी चव्हाण, विश्वनाथ आंब्राळे यांनी ही कारवाई केली. सजन हंकारे तपास करत आहेत.