Tokyo Olympics : टोकियो ऑलिम्पिकमध्ये प्रेक्षकांना परवानगी?

टोकियो – खेळ कोणताही असो, त्याचे सामने पाहण्यासाठी प्रेक्षकच नसतील तर खेळाडूंनाही प्रोत्साहन मिळत नाही. करोनाच्या धोक्‍यात प्रेक्षकांना सामने पाहण्यासाठी मैदानावर उपस्तित राहण्याची परवानगी मिळत नव्हती. मात्र, जपानमध्ये करोनाचा धोका काहीसा कमी झाल्याचे समोर आल्यामुळे आगामी ऑलिम्पिक स्पर्धांचे सामने पाहण्यासाठी प्रेक्षकांना परवानगी देण्याचे ठरवले गेले आहे. प्रत्यक्ष निर्णय येत्या काही दिवसांत जाहीर केला जाणार आहे, अशी माहिती जपान ऑलिम्पिक संघटनेच्या नवनियुक्त अध्यक्षा सेईको होशिमोटो यांनी दिली आहे.

जपानमध्ये विविध खेळांच्या सामन्यांना आता प्रेक्षकांना परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे आगामी ऑलिम्पिक स्पर्धेलाही अशी परवानगी दिली जाईल. मात्र, त्यापूर्वी टोकियोत ज्या ठिकाणी स्पर्धा होणार आहेत, तेथील तसेच शहरातील करोनाच्या परिस्थितीचा आढावा घेतला जाणार असून त्यानंतरच निर्णय घेण्यात येईल, असेही त्या म्हणाल्या.

जेव्हा ऑलिम्पिक स्पर्धा घेण्याचा विचार केला गेला तेव्हाच प्रेक्षकांबाबतही चर्चा झाली. अन्य खेळासाठी प्रेक्षकांच्या उपस्थितीला मान्यता आहे, तर मग ऑलिम्पिकसाठी का नाही. ऑलिम्पिक स्पर्धा कोणत्याही स्थितीत होणार हे स्पष्ट असताना प्रेक्षकांच्या उपस्थितीचा निर्णयही लवकर व्हायला हवा. कारण त्यानुसार तिकिटे उपलब्ध करणे तसेच हॉटेल्सही खुली करणे या गोष्टी त्यावर अवलंबून आहेत, असेही त्यांनी सांगितले आहे.

सात वेळच्या ऑलिम्पिक पदक विजेत्या सेईको यांनी गेल्याच आठवड्यात टोकियो ऑलिम्पिक संघटनेच्या अध्यक्षा म्हणून पदभार स्वीकारला. यापूर्वीचे अध्यक्ष योशिरो मोरी यांच्यावर महिलेला उद्देशून आक्षेपार्ह शब्दप्रयोग केल्याचा आरोप आहे. त्यामुळे स्पर्धेला केवळ पाच महिने बाकी असताना त्यांना अध्यक्षपद सोडावे लागले.

प्रेक्षकांच्या संदर्भात स्थानिक आणि परदेशी असा दोन्ही बाजूने विचार केला जाणार आहे. टोकियोमध्ये सध्या सुरू असलेली आणिबाणिची परिस्थिती आता संपत आली आहे. त्यामुळे आता एप्रिलपासून टोकियोत क्रीडा स्पर्धा अपेक्षित आहेत. यात ऑलिम्पिकच्या चाचणी स्पर्धा, फुटबॉल विश्‍वकरंडक पात्रता फेरी सामन्यांचा समावेश आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.