मुंबई – मुंबईतील वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स परिसरातील अमेरिकन वाणिज्य दूतावासात काल बॉम्बची धमकी देणारा ई-मेल मिळाला. त्यानंतर या वाणिज्य दूतावासाची सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे.
अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन यांनी तात्काळ जाहीर माफी मागावी अन्यथा प्रत्येक अमेरिकन दूतावास उडवून दिला जाईल, असे ई-मेलमध्ये म्हटले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काल दुपारी 3.50 च्या सुमारास दूतावासाला हा ई-मेल प्राप्त झाला.
ई-मेल पाठवणाऱ्याने स्वत:ला फरारी अमेरिकन नागरिक असल्याचे सांगितले आहे. त्याच्यावर अमेरिकेत १९ गुन्हे दाखल असल्याचे त्याने म्हटले आहे.
दूतावासाकडून ही माहिती मिळाल्यानंतर वांद्रे-कुर्ला पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ई-मेल पाठवणाऱ्या व्यक्तीचे तपशील पोलिस गोळा करत आहेत.