नवी दिल्ली – पाकिस्तानमध्ये इस्लामाबाद आणि लाहोर उच्च न्यायालयांच्या न्यायाधीशांना पांढऱ्या विषारी पावडरने लिहीलेले धमकीचे पत्र पाठवण्यात आले आहे. न्यायालयांच्या रजिस्ट्रारने ही माहीती दिली. लाहोर उच्च न्यायालयातील न्या. शुजात अली खान, न्या. शाहिद बिलाल हसन आणि न्या. आलिया नीलम यांना असे धमकीचे पत्र मिळाले आहे.
बुधवारी न्यायाधीशांना धमकीचे पत्र मिळाल्याचे समजताच लाहोर पोलीस आणि काऊंटर टेरेरिझम डिपार्टमेंटचे वरिष्ठ अधिकारी उच्च न्यायालयात दाखल झाले आणि त्यांनी हे पत्र ताब्यात घेतले आहे. तपास करायला सुरुवात केली. त्याचबरोबर लाहोर उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची सुरक्षा देखील वाढवण्यात आली आहे.
हे पत्र ज्या कुरिअर कंपनीद्वारे पाठवण्यात आले होते, त्या कंपनीच्या कर्मचाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून अज्ञात ठिकाणी रवाना करण्यात आले आहे. हे पत्र ज्या पांढऱ्या पावडरने लिहीलेले होते, ती एँथ्रॅक्स असल्याचा संशय आहे. ही पावडर तपासणीसाठी प्रयोगशाळेमध्ये पाठवण्यात आली आहे, असे पोलिसांच्या प्रवक्त्याने सांगितले.
एक दिवस आगोदरच इस्लामाबाद उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आमेर फारुख यांच्यासह सर्व ८ न्यायाधीशांनाही अशा प्रकारचे धमकीचे पत्र पाठवण्यात आले होते.
काही दिवसांपूर्वी आयएसआय या गुप्तहेर संघटनेकडून न्यायप्रक्रीयेमध्ये हस्तक्षेप केला जात असल्याचा आरोप इस्लामाबाद उच्च न्यायालयाच्या ६ न्यायाधीशांनी सरन्यायाधीशांना पाठवलेल्या एका पत्रात केला होता.
अनुकूल निकाल दिला जावा यासाठी आयएसआयकडून आपल्यावर दबाव आणला जातो, पाळत ठेवली जाते आहे. नातेवाईकांचे अपहरण आणि छळ केला जात आहे, असा आरोप या पत्रात केला गेला होता. सर्वोच्च न्यायालयाने स्वतःहून हे प्रकरण दाखल करून घेतले आणि सरन्यायाधीश काझी फैज इसा यांच्या अध्यक्षतेखाली ७ सदस्यीय पीठाची स्थापना केली होती. त्याच्या दुसऱ्याच दिवसापासून ही धमकीची पत्रे पाठवली जाऊ लागली आहेत.
माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी या प्रकरणाची त्वरित आणि कसून तपास करण्याची मागणी केली आहे.अलिकडे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांच्याशी संबंधित अनेक प्रदीर्घ प्रलंबित प्रकरणात त्यांना आणि त्यांच्याशी संबंधित अनेकांना न्यायालयांकडून निर्दोष मुक्त केले गेले आहे. तर इम्रान खान यांच्यावर एकापाठोपाठ एक अनेक खटले दाखल केले गेले आणि त्यात त्यांना दोषी ठरवले गेले आहे.