नवी दिल्ली – म्यानमारमध्ये लष्कर आणि बंडखोर गटांमधील संघर्ष अजूनही सुरू असून सीमेजवळील रहिवासी भागातील बंडखोर गटांनी राजधानी नायपितॉवर ड्रोन हल्ला केल्याचा दावा केला आहे. राजधानीच्या परिसरातील लष्करी मुख्यालय आणि तेथील विमानतळावर हा ड्रोन हल्ला करण्यात आल्याचा दावा बंडखोर गटांनी केला आहे. मात्र ही सर्व ड्रोन हवेतच उडवण्यात आल्याचे म्यानमारच्या लष्कराने म्हटले आहे.
पीपल्स डिफेन्स फोर्सच्या विशेष दलांनी ही ड्रोन डागली होती, असे लष्करी शासनाला समांतर सरकार स्थापन केलेल्या नॅशनल युनिटी गव्हर्नमेंटच्या संरक्षण मंत्रालयाने म्हटले आहे.
लष्करी मुख्यालयापासून १६ किलोमीटर अंतरावर असलेल्या विमानतळाच्या आवारातील हवाई दलाच्या आणि नागरी तळावर ही ड्रोन सोडण्यात आली होती, असे बंडखोरांच्या गटाने म्हटले आहे. यापैकी ७ ड्रोनपाडली गेली. या ड्रोन हल्ल्यात कोठेही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही, असे लष्कराने म्हटले आहे. या दोन्ही दाव्यांची पडताळणी केली जाऊ शकलेली नाही.