विज्ञानविश्‍व: “त्या’ फोटोमागचा डेटा

डॉ. मेघश्री दळवी

प्रत्यक्ष प्रकाशालाही आपल्या गुरुत्वाकर्षणात जखडून ठेवणारी अवकाशातली ब्लॅक होल (कृष्णविवर) ही अजब चीज सर्वांनाच भुरळ घालते. दहा एप्रिलला ब्लॅक होलचा पहिलावहिला फोटो प्रसारित झाला आणि जगात उत्साहाला उधाण आलं. ब्लॅक होलचा हा फोटो म्हणजे कॅमेऱ्यातून काढलेला फोटो नाही तर सहा ठिकाणच्या आठ वेधशाळांनी एकत्र येऊन, जणू अख्ख्या पृथ्वीलाच एक अवाढव्य वेधशाळा करून, अनेक दुर्बिणींमधून मिळवलेला डेटा एकत्र आणून ही प्रतिमा तयार झाली आहे.

या प्रतिमेमागे किती डेटा आहे माहीत आहे? पाच पेटाबाइट. एक पेटाबाइट म्हणजे एक हजार टेराबाइट. आपल्या लॅपटॉपमधली दोन टेराबाइटची हार्डडिस्क कधी भरलेली दिसत नाही. पण अशा अडीच हजार भरलेल्या हार्डडिस्कची नुसती कल्पना करून बघा! पाच पेटाबाइटची गाणी ऐकायची असतील, तर तुम्हाला लागतील चक्‍क पाच हजार वर्षे. पाच पेटाबाइटमध्ये बसतील आजवर प्रसिद्ध झालेली सगळी पुस्तकं आणि सोबत सत्तर हजारांहून अधिक चित्रपट!

एप्रिल 2017 मध्ये एक आठवडाभर मेक्‍सिको, चिली, हवाई, स्पेन, अरायझोना आणि अंटार्क्‍टिका इथल्या वेधशाळांनी आपापल्या दुर्बिणी या ब्लॅक होलच्या दिशेने रोखल्या. या निरीक्षणातून डेटा गोळा करण्यासाठी खास वेगवान डेटा रेकॉर्डर्स वापरले होते. त्यातून मिळालेला एकूण पाच पेटाबाइट डेटा वेगवेगळ्या ठिकाणाहून एकत्र करणे हे एक मोठं दिव्य होतं.

आपल्याला एखादी फाइल पाठवायची असेल तर आपण ई-मेलला अटॅच करतो. मोठी फाइल शेअर करायची असेल तर गुगल ड्राइव्ह, ड्रॉपबॉक्‍स अशा सेवा वापरतो. पण या प्रचंड प्रमाणातल्या डेटासाठी हे व्यर्थच ठरेल. क्‍लाऊडवर डेटा शेअर करणाऱ्या ऍमेझोनसारख्या काही सेवा आहेत. पण डेटा अपलोड-डाऊनलोड करण्यातला वेळ आणि एकूण खर्च पाहता त्याही उपयोगाच्या नाहीत. म्हणून तो डेटा हार्ड डिस्कमध्ये भरून त्या हार्ड डिस्क्‍स विमानाने पाठवायच्या हा निर्णय घेण्यात आला. आहे न मजा, एकीकडे एकदम अत्याधुनिक हाय-टेक तंत्रज्ञान वापरायचं आणि दुसरीकडे सर्व दृष्टीने सोयीचं पडेल म्हणून जुनं लो-टेक! त्यामुळेच बहुधा असे प्रकल्प रोमांचकारी होत असतील.

पाचशे किलो वजनाच्या हार्ड डिस्कमधून आलेल्या या डेटावर प्रक्रिया करण्याचं काम अमेरिकेतील मॅसाच्युसेट्‌स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्‍नॉलॉजीमधली हेस्टॅक वेधशाळा आणि जर्मनीमधली मॅक्‍स प्लांक इन्स्टिट्यूट ऑफ रेडिओ ऍस्ट्रॉनॉमी इथे पार पडलं. सर्वात कठीण होतं ते अंटार्क्‍टिकाहून हार्ड डिस्क आणणं. तिथला हिवाळा संपल्यावर डिसेंबर 2017 मध्येच अंटार्क्‍टिकाचा डेटा प्रक्रियेसाठी पोचू शकला.

हा डेटा साफसूफ करून घेणं हे खूप मोठं काम होतं. एवढ्या प्रचंड डेटामध्ये तोच तोच डेटा अनेकदा येऊ शकतो, काही डेटा चुकीचा असू शकतो, काही गहाळ झालेला असू शकतो तर, काही डेटा वगळावाही लागतो. हे सगळं करून विशेष सॉफ्टवेअर वापरून ही प्रतिमा तयार झाली आहे. त्यामुळे एवढा प्रचंड खटाटोप करायला दोन वर्षे लागली तर नवल नाही. मात्र, शेवटी मिळवलेली ही ब्लॅक होलची पहिलीवहिली प्रतिमा पाहून हे श्रम खरोखरीच सार्थकी लागले म्हणता येईल!

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.