प्रभात वृत्तसेवा पुणे, दि. 23 -गेले 33 वर्षे रसिक पुणेकरांना सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवाणी देणारा “पुणे फेस्टिव्हल यंदा 31 ऑगस्टपासून रंगणार असून, यंदाही भरगच्च कार्यक्रमांची मेजवानी असल्याचे फेस्टिव्हलचे उपाध्यक्ष कृष्णकुमार गोयल यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
दि. 2 सप्टेंबर रोजी सायंकाळी 5 वाजता केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली गणेश कला क्रीडा रंगमंच येथे होणार आहे. या उद्घाटन सोहळ्यास राज्याचे पर्यटन व पर्यावरण मंत्री मंगलप्रभात लोढा, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, खासदार गिरीश बापट प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. यासोबतच महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक राजेश पाटील आणि अभिनेते सुनील शेट्टी हे देखील याप्रसंगी उपस्थित राहणार आहेत.
पुण्याचे नाव जागतिक उद्योग नकाशावर नेणारे व पुणे फेस्टिव्हलशी प्रथम वर्षापासून जोडले गेलेले ज्येष्ठ उद्योगपती पद्मभूषण कै. राहुल बजाज यांच्या स्मृतीस यंदाचा 34 वा पुणे फेस्टिव्हल अर्पण करण्यात आला असल्याचे गोयल यांनी सांगितले. यावेळी मुख्य संयोजक डॉ. सतीश देसाई आणि पी. ए. इनामदार उपस्थित होते.
करोनामुळे दोन वर्षे हा फेस्टिव्हल झाला नव्हता. यंदा 31 ऑगस्ट ते 9 सप्टेंबर दरम्यान फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात आले आहे. पुणे फेस्टिव्हलमध्ये भारतरत्न लता मंगेशकर, भारतरत्न पं. भीमसेन जोशी, पद्मविभूषण पं. शिवकुमार शर्मा, पद्मविभूषण अभिनेते दिलीपकुमार आणि शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना श्रद्धांजली वाहणारे कार्यक्रम गणेश कला क्रीडा रंगमंच येथे होतील.
बालगंधर्व कलादालन येथे महिलांची चित्रकला स्पर्धा व प्रदर्शन, पंडित जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक भवन येथे उगवते तारे व इंद्रधनू आणि हॉटेल तरवडे क्लर्कस इन येथे पाककला स्पर्धा, जपानी पुष्परचना व मंगळागौरी खेळ व क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.
फेस्टिव्हलमधील आकर्षण…
आबेदा इनामदार यांचा “ऑल इंडिया मुशायरा’
अभिनेत्री हेमा मालिनी यांचा “बॅले’
अशोक हांडे यांचा “आजादी का अमृत महोत्सव’
राहुल देशपांडे यांची “संगीत मैफल’
मिस पुणे फेस्टिव्हल स्पर्धा
वारकऱ्यांचा “खेळ मांडियेला’
“मिले सूर मेरा-तुम्हारा’