हिंगोली,(प्रतिनिधी शिवशंकर निरगुडे) – दसरा महोत्सव गेल्या पाच दिवसांपासून सुरू झाला आहे हिंगोली येथील दसरा महोत्सव सर्वदूर प्रसिद्ध आहे येथे अनेक जिल्ह्यातील ग्रामस्थ दसरा महोत्सव पाहण्यासाठी येतात. हिंगोली येथील रामलीला मैदानात हा दसरा महोत्सव भरतो. येथे उंच उंच आकाशपाळने येतात त्यासह अनेक दुकाने देखिल दसरा महोत्सवात येतात ही सर्व दृश्य ड्रोन द्वारे प्रेस फोटोग्राफर सुनील पाठक यांनी टिपलेली आहेत.
येथील दसरा महोत्सव भव्यदिव्य असतो. यंदा रावणाच्या ५१ फूट उंच पुतळ्याचे दहन केले जाणार आहे. रावणाचा वेळूच्या कामट्या व अन्य साहित्यापासून पुतळा तयार करण्याचे काम सुरू आहे. हिंगोली येथील दसरा महोत्सव सुरू झाला असून रामलीला मैदानावर कृषी व औद्योगिक प्रदर्शनही सुरू आहे. रोज सायंकाळी रामलीलेचा कार्यक्रमही सुरू झाला आहे. दसरा महोत्सवात रावण, मेघनाथ, त्राटिका, जटायू, हरिण आदींचे पुतळे तयार करून ते उभे केले जातात.
सध्या रामलीला मैदानावर असलेल्या सार्वजनिक दसरा महोत्सव समितीच्या कार्यालयात वेळूच्या कामट्यांपासून रावण व मेघनाथ यांचे पुतळे तयार करण्याचे काम सुरू आहे. अनेक वर्षांपासून बाबूलाल बमरुले हे पुतळे तयार करतात. यावर्षीही तेच हे काम करत आहेत. त्यांची मुले दीपक बमरुले, अशोक बमरुले यांच्यासह इतर सहकारीही पुतळे तयार करण्यात मग्न आहेत.यंदा ५१ फूट उंचीचा व दहातोंडे असलेल्या रावणाचा पुतळा तयार केला जात आहे. दसऱ्याच्या सकाळी तो उभा केला जातो. सायंकाळी त्याचे दहन केले जाते. इतर पुतळे दसरा समितीच्या कार्यालयासमोर उभे केले जातात.