नगर -येथील इव्हॅनजेलीन बूथ हॉस्पिटलला (दगडी दवाखाना) यंदाचा कॉ. भास्कर जाधव अभिवादन सेवा संस्था पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. संयोजकांनी ही माहिती दिली.गेली 120 वर्षे अविरतपणे ग्रामीण गरीब कष्टकरी जनतेला अत्यल्प दरात आरोग्यसेवा उपलब्ध करुन देणाऱ्या व दगडी दवाखाना या नावाने सुपरिचित असणाऱ्या या दवाखान्याने प्लेग ते करोना, या साथीच्या रोगांच्या काळात जीवाला धोका पत्करुन आरोग्यसेवा दिली.
त्यांच्या या अविरत कार्याचा सन्मान म्हणन सॅलव्हेशन आर्मी संचलित या दवाखान्यात राज्यस्तरीय कॉ. भास्कर जाधव पुरस्कार जाहीर करण्यात आला. कॉ. भास्करराव जाधव स्मृति प्रतिष्ठानच्या वतीने ही माहिती देण्यात आली. कॉ. भास्करराव जाधव यांनी आयुष्यभर दलित कामगार कष्टकरी, असंघटीत सेवातील मजूर यांची संघटनात्मक शक्ती उभी करुन त्यांच्या न्याय मागण्यांसाठी काम केले. कॉ. जाधव हे डाव्या चळवळीतले कट्टर मार्क्सवादी पूर्णवेळ कार्यकर्ते तसेच दैनिक श्रमिक विचारचे संपादक होते. अनेक वर्षांपासून त्यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ हा पुरस्कार सेवाभावी काम करणाऱ्यांना दिला जातो. गतवर्षी हा पुरस्कार क्रांतीशाहीर दिवंगत शंतनू कांबळे यांना मरणोत्तर प्रदान करण्यात आला.
यंदाच्या वर्षी प्रथमच हा पुरस्कार सेवाभावी आरोग्यसंस्थेला जाहीर करण्यात आला आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर गोरगरीबांना अल्पदरात उत्तम सेवा देणारी तसेच करोनाबाधितांनाही सेवा पुरविणाऱ्या या दवाखान्याच्या गौरवार्थ देण्यात आला आहे. सध्या सॅलव्हेशन आर्मीचे प्रशासक मेजर देवदान कळकुंबे व आर. एम. ओ डॉ. जॉन उजागरे यांच्या देखरेखीखाली बुथ हॉस्पिटल सेवा परंपरा राखत आहे.