काराकस (व्हेनेझुएला): व्हेनेझुएलामधील सर्वोच्च न्यायालयाने देशातील दोन सर्वात ताकदवान राजकीय पक्षांना ताब्यात घेण्याचे आदेश दिले आहेत. देशातील समाजवादी विचारसरणीच्या सरकारला या राजकीय पक्षांकडून विरोध केला जात होता.
व्हेनेझुएलाचे अध्यक्ष निकोल्स मादुरो यांच्याशी सर्वोच्च न्यायालयाची खूप घनिष्ठ बांधिलकी असल्याचे मानले जात आहे.
जस्टीस फर्स्ट आणि डेमोक्रॅटिक ऍक्शन पार्टी या दोन राजकीय पक्षांचे वरिष्ठ कार्यकारी मंडळ बरखास्त करण्यात यावे आणि त्यांच्या जागेवर नवीन कार्यकारिणी निवडण्यात यावी, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. यातील डेमोक्रॅटिक ऍक्शन पार्टी हा देशातील सर्वात जुनी आणि सर्वात मोठा राजकीय पक्ष आहे. अत्यावश्यक फेरनिर्माण प्रक्रियेचा भाग म्हणून हे फेरबदल करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. या संदर्भातील आदेश फेसबुकवर प्रसिद्ध करण्यात आले आहेत.
देशातील विरोधी पक्षांनी व्हेनेझुएलाला लुबाडण्यासाठीच गेल्या पाच वर्षात राष्ट्रीय संसदेवर नियंत्रण राखले आहे, असा आरोप मादुरो यांनी टीव्हीवरून केला होता. हे विरोधी पक्ष देशातील समाजवादी सरकार संपवण्याअसाठी विदेशी घुसखोरीला मदत करत असल्याचा आरोपही त्यांनी केला होता.