पुणे : सीबीएसई बोर्डाच्या इयत्ता बारावी परीक्षेचा निकाल शुक्रवारी जाहीर झाला. यंदा बारावी परीक्षेत एकूण 87.33 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, पुन्हा एकदा मुलींनी आघाडी घेतली आहे. गतवर्षी बारावीचा निकाल 92.71 टक्के इतका लागला होता. यावर्षी निकाल गतवर्षीच्या तुलनेत 5.38 टक्क्यांनी घटला आहे.
यावर्षी बारावी सीबीएसई बोर्ड बारावीची परीक्षा 15 फेब्रुवारी ते 5 एप्रिल या कालावधीत घेण्यात आली होती. यंदा बारावी 16 लाख 80 हजार 256 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 16 लाख 60 हजार 511 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यापैकी 14 लाख 50 हजार 174 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, त्याची टक्केवारी 87.33 आहे.
मुलांचे उत्तीर्णतेचे प्रमाण 84.67 टक्के आहे, तर मुलींची उत्तीर्णतेचे प्रमाण 90.68 टक्के आहे. मुलींचे उत्तीर्णतेचे प्रमाण मुलांपेक्षा 6 टक्क्यांनी अधिक आहे. यावर्षी 90 टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळविलेल्या विद्यार्थ्यांची संख्या 1 लाख 12 हजार 838 इतके आहेत. 95 टक्क्यांपेक्षा अधिक गुण घेतलेल्या विद्यार्थ्यांची संख्या 22 हजार 622 इतके आहेत. बारावीच्या परीक्षेत त्रिवेंद्रम विभागाने सर्वाधिक गुण मिळवले असून, सर्वात कमी निकाल प्रयागराज विभागाचा आहे.
यंदा कोणतीही टॉपर लिस्ट नाही
यंदा सीबीएसई बोर्डाने विद्यार्थ्यांमधील स्पर्धा टाळण्यासाठी बारावी परीक्षेच्या निकालातील टॉपर लिस्ट प्रसिद्ध न करण्याचा निर्णय घेतला आहे. याव्यतिरिक्त बोर्डाने प्रथम, द्वितीय किंवा तृतीय क्रमांकांनी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची नावे जाहीर न करण्याचाही निर्णय घेतला आहे. विद्यार्थ्यांनी रॅंक आणि विभागासाठी स्पर्धा करण्याऐवजी स्वतः शिकण्यावर आणि शैक्षणिक वाढीवर लक्ष केंद्रित करण्यास प्रोत्साहित करणे आहे, असे उद्देश असल्याचे सीबीएसईने स्पष्ट केले आहे.
विभागनिहाय निकाल
त्रिवेंद्रम विभाग : 99.91 टक्के. बंगळुरू विभाग : 98.64 टक्के. चेन्नई विभाग : 97.40. दिल्ली वेस्ट : 93.24. चंदीगढ विभाग : 91.84 टक्के. दिल्ली पूर्व विभाग : 91.50 टक्के. अजमेर विभाग : 89.27 टक्के. पुणे विभाग : 87.28 टक्के. पंचकुला विभाग : 86.93. पटना : 85.47. भुवनेश्वर विभाग : 83.89 टक्के. गुवाहाटी विभाग : 83.73. भोपाळ विभाग : 83.54. नोएडा विभाग : 80.36 टक्के. डेहराडून : 80.26. प्रयागराज विभाग : 78.05 टक्के.