करोनाच्या पार्श्वभूमीवर श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टने घेतला निर्णय
ऑनलाईन दर्शन सुविधांवर देणार भर
पुणे – दरवर्षी होणाऱ्या वैभवशाली गणेशोत्सवाचा डामडौल रद्द करुन यंदा करोनाच्या पार्श्वभूमीवर समाजहित व भक्तांच्या आरोग्य हिताच्या दृष्टीने श्रीमंत दगडूशेठ गणपतीचा गणेशोत्सव मुख्य मंदिरामध्येच होणार आहे. करोनाच्या जागतिक महामारीच्या पार्श्वभूमीवर गणेशभक्त व नागरिकांमध्ये याचा प्रादुर्भाव वाढू नये, याकरीता लोकभावना जपण्यासाठी मंदिरात उत्सव होणार आहे.
दरवर्षी उत्सवाची पारंपरिक जागा असलेल्या कोतवाल चावडी येथे दगडूशेठ गणपती विराजमान होतो. मात्र, गेल्या १२७ वर्षात यंदा प्रथमच ही परंपरा खंडित होत आहे. पुण्यातील करोनाचा वाढता प्रादुर्भाव व दगडूशेठ गणपतीच्या दर्शनाला होणारी अलोट गर्दी पाहता रस्त्यावरील उत्सव मंदिरात घेण्यात येणार आहे.
मंदिरामध्ये उत्सव साजरा करण्यासोबतच बाप्पांच्या ऑनलाईन दर्शन सुविधेवर व ऑनलाईन कार्यक्रमांवर भर देण्यात येणार असल्याची माहिती श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळाच्या वतीने ट्रस्टच्या १२८ व्या वर्षी मंदिरामध्येच उत्साहात गणपती विराजमान होणार आहे. यावर्षी गणेशोत्सवात आरोग्यविषयक जनजागृती व आरोग्यसेवा देण्यात येणार आहेत. मंदिराच्या परिसरात पूर्णवेळ रुग्णवाहिका देखील असणार आहे. मंदिरामध्ये प्रवेश न करता बाहेरुनच बाप्पांचे दर्शन भाविकांना घेता येणार आहे. तसेच हार, फळे, पेढे, नारळ देखील स्विकारले जाणार नाहीत आणि प्रसादही दिला जाणार नाही.