श्रीक्षेत्र वीर यात्रेत रंगली भाकणूक
परिंचे – मृगाचे पाणी तीन खंडात पडेल. बाजरीचे पीक चांगले येणार असून मगा दोन खंडात व उत्तरा पूर्वा चार खंडात पडून शेतकरी समाधानी होईल. हत्तीचे पाणी चार खंडात समाधानकारक पडणार आहे. मृग नक्षत्रात पेरणी करणाऱ्यांना सव्वास सव्वाशेर मिळेल. एकास सव्वाशेर उत्पन्न शेतकऱ्यांच्या पदरात पडणार आहे. वेळेत पेरणी करणाऱ्या शेतकऱ्याला सव्वास सव्वाशेर मिळणार असल्याचे या भविष्यवाणी श्रीक्षेत्र वीर येथे गुरुवारी (दि. 13) पंचमीनिमित्त सांगण्यात आली. भाकणूक झाल्यावर पालखीच्या तीन मंदिर प्रदक्षिणा पूर्ण झाल्यावर छबिन्याची सांगता झाली.
श्रीक्षेत्र वीर (ता. पुरंदर) येथे गुरुवारी (दि. 13) पंचमी निमित्त देवाची भाकणूक (भविष्यवाणी) व गजे गोपाळ(जेवणावळी) करण्यास सुरुवात झाली. भविष्यवाणी ऐकण्यासाठी देऊळवाड्यात भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. हजारो भाविकांच्या उपस्थितीत “सवाई सर्जाचा’ जयघोष करत भाकणूक साजरी करण्यात आली.
दरम्यान, पंचमीनिमित्त पहाटे श्रीनाथ म्हस्कोबांची महापूजा करण्यात आली मंदिराचा मुख्य गाभारा बंद करण्यात आला. सकाळी सहा वाजता मंदिर दर्शनासाठी खुले करण्यात आले. सकाळपासून मंदिरात भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. कोडीत, कन्हेरी, थोपटेवाडी ,सोनवडी, राजेवाडी, कसबा पेठ (पुणे) सर्व फुलांनी सजवलेल्या पालख्यामध्ये उत्सव मूर्ती ठेवण्यात आल्या. देवाची धुप आरती झाल्यावर छबिन्याला सुरुवात झाली. वस्त्र परिधान केलेल्या मानाच्या काठ्या व पालख्यांची एक मंदिर प्रदक्षिणा पूर्ण झाल्यावर देवाचे मानकरी तात्याबा बुरुंगले यांनी भविष्यवाणी सांगितली.
भाकणूकीसाठी मंदिरामध्ये समस्त ग्रामस्थ, मानकरी, सालकरी, दागिनदार मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. दिवसभरात हजारो भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला असल्याचे देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष बाळासाहेब धुमाळ यांनी सांगितले. सासवड पोलीस ठाण्याच्या वतीने चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आल्याचे प्रियंका जगताप
यांनी सांगितले. यावेळी रूपाली जमदाडे, आरती इंगळे आदी पोलीस कर्मचारी उपस्थित होते.