डॉक्‍टर व नादुरुस्तीमुळे 50 टक्‍के रुग्णवाहिकांना ब्रेक

जयंत कुलकर्णी
नगर  – अपघात, गर्भवती महिलांच्या आरोग्यासाठी अत्यावश्‍यक झालेली 108 रुग्णवाहिका सेवेचा नगर जिल्ह्यात बट्ट्याबोळच झाला आहे. कमी वेतनामुळे डॉक्‍टराचा अभाव, वेळोवेळी रुग्णवाहिकांची देखभाल दुरुस्ती होत नसल्याने अनेक रुग्णवाहिका नादुरुस्ती स्थितीत पडल्या आहेत. यामुळे जिल्ह्यातील तब्बल 50 टक्‍के रुग्णवाहिकांना ब्रेक लागला आहे.

108 कॉलसेंटरला फोन केल्यानंतर न उचलणे, रुग्णवाहिका वेळेत न पोहचणे, रुग्णवाहिकेत अत्यावश्‍यक औषधे नसणे या कारणामुळे आता या 108 रुग्णवाहिकेची “क्रेज’ कमी झाली आहे. रुग्ण वाहतूकीची संख्या देखील रोडावली असून खासगी रुग्णवाहिकांना पुन्हा चांगले दिवस आले आहेत.

सार्वजनिक आरोग्य विभागाने भारत विकास ग्रुप (बीव्हीजी) इंडिया लिमिटेड या कंपनीच्या माध्यमातून 21 मार्च 2014 मध्ये राज्यात 108 रुग्णवाहिका सेवा सुरू केली. यामध्ये ऍडव्हान्स लाइफ सपोर्ट आणि बेसिक लाइफ सपोर्ट अशा दोन प्रकारच्या रुग्णवाहिकांचा समावेश आहे. अपघात झाल्यास किंवा दवाखान्यातून जाऊन तत्काळ उपचार घेण्याची गरज भासल्यास 108 क्रमांकावर कॉल करताच किमान 10 मिनिटात रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल होते. रुग्णवाहिका वेळेत आल्याने अनेकांना योग्य वेळी उपचारही मिळतो; पण रुग्णांसाठी संजीवनी ठरणाऱ्या या रुग्णवाहिका सेवाला घरघर लागली आहे.

सुरवातीचे चार वर्ष या सेवाचा हजारो रुग्णांना लाभ झाला. पण आता या कंपनीकडून दिल्या जाणाऱ्या सेवेबद्दल रुग्ण नाही तर वैद्यकीय अधिकारी देखील नाराजी व्यक्‍त करू लागले आहेत. या रुग्णवाहिकेत दोन डॉक्‍टर, व दोन चालकासह सर्व वैद्यकीय साहित्य व औषधे उपलब्ध असणे आवश्‍यक आहे. पण जिल्ह्यात असलेल्या 40 रुग्णवाहिकांपैकी सध्या 20 रुग्णवाहिका बंद आहेत. डॉक्‍टराचा अभाव व नादुरूस्तीमुळे या रुग्णवाहिका रस्त्यावर धावू शकत नाहीत. जिल्ह्यात 40 रुग्णवाहिकांसाठी 120 डॉक्‍टरांची आवश्‍यकता आहे.

परंतु आज मितीला केवळ 62 डॉक्‍टर उपलब्ध आहेत. डॉक्‍टरांना कमी वेतनात राबवून घेण्यात येत असल्याने अनेक डॉक्‍टरांनी या 108 रुग्णवाहिकेची नोकरी सोडून शासकीय सेवेत दाखल होणे पसंत केले आहे. त्यामुळे आज 108 रुग्णवाहिकेवर डॉक्‍टरच नाहीत.

रुग्णवाहिकांची देखभाल नाहीच
108 सेवा पुरविण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे कोट्यवधींचा निधी खर्च केला जातो; परंतु या रुग्णवाहिकांची नियमित देखभाल केली जात नाही. त्यामुळे अनेक रुग्णवाहिका बंद आहेत. शिवाय, बहुतांश नादुरुस्त रुग्णवाहिका रस्त्यावर धावत आहे. त्यामुळे रुग्णांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. टायर खराब झाल्याची बाबत वैद्यकीय अधिकाऱ्यांनी निर्देशना आणून दिल्यानंतर तब्बल चार महिन्यांनी टायर बदलण्यात आले.

सेवेच्या अभावामुळे रुग्ण संख्येत घट
सुरवातीला या 108 सेवेला चांगला प्रतिसाद मिळाला. पण सेवा बोथट होत गेल्याने रुग्णांची संख्याही कमी होत गेली. 2014 मध्ये 8 हजार 405 रुग्णांनी लाभ घेतला. 2015 मध्ये 19 हजार 437, 2016 मध्ये 26 हजार 172, 2017 मध्ये 29 हजार 927, 2018 मध्ये 14 हजार 595 तर सन 2019 मध्ये 17 हजार 139 रुग्णांनी लाभ घेतला आहे. दिवसेंदिवस रुग्ण संख्या कमी होत आहे.

वैद्यकीय साहित्य व औषधे अपुरे
108 रुग्णवाहिकांमध्ये अत्यावश्‍यक औषधे व वैद्यकीय साहित्य असे गरजेचे आहे. कंपनीकडूनच या औषधे व साहित्याचा पुरवठा करण्यात येतो. वेळोवेळी मागणी करूनही ते उपलब्ध होत नाही. त्यामुळे नेहमीच औषधे व वैद्यकीय साहित्य अपुरेच असतात. त्यात रुग्णवाहिका अस्वच्छ असते. यामुळे रुग्णांसह नातेवाईकांना रुग्णवाहिकेत बसणे अशक्‍य होते.

लोकप्रतिनिधींचा वाढता दबाव
108 रुग्णवाहिकेतून शासकीय रुग्णालयापर्यंत रुग्णांची वाहतूक करण्याचे आदेश आहेत. परंतु या रुग्णवाहिकेतून रुग्णांना खासगी रुग्णालयात पोहच करण्याचा दबाव लोकप्रतिनिधींकडून येत असल्याचे आढळून आले. त्यामुळे सर्रास खासगी रुग्णालयात या रुग्णवाहिका दिसत आहे. त्यात लोकप्रतिनिधींसह नातेवाईक व काही प्रमाणात रुग्णवाहिकेतील डॉक्‍टर यांच्यातील खासगी डॉक्‍टरांची असलेले लागेबांधे ही कारणीभूत ठरत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.