पुणे -जिल्ह्यात करोना संसर्ग पुन्हा वाढत असून दिवसेंदिवस रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना आवश्यक आहेत. त्यादृष्टीने होळी, धुलिवंदन हे दोन्ही उत्सव सार्वजनिक ठिकाणी साजरे करण्यास प्रशासनाने बंदी आणली आहे.
गर्दी टाळण्यासाठी पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण कार्यक्षेत्रात सार्वजनिक ठिकाणी, हॉटेल्स, रिसॉर्ट, सार्वजनिक सभागृहे, सार्वजनिक व खासगी मोकळ्या जागा, सर्व गृहनिर्माण संस्थांमधील मोकळ्या जागा येथे दि.28 मार्च रोजी साजरा होणारा होळी उत्सव तसेच दि.29 मार्च रोजी साजरा होणारा धुलिवंदन व रंगपंचमी उत्सव साजरे करण्यास मनाई करण्यात येत असल्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी दिले आहेत.
जिल्ह्यातील यात्रा, उत्सव आयोजित करण्यास परवानगी देण्याबाबत निर्णय घेण्यास जिल्हाधिकारी यांना प्राधिकृत केले आहे. करोना संसर्ग वाढत असल्याची बाब विचारात घेता, नागरिकांनी पालन करावयाचे कार्यप्रणालीनुसार पुणे जिल्हयाच्या ग्रामीण क्षेत्रामध्ये साजरे होणारे होळी व धुलीवंदन सण उत्सव एकत्रित येऊन साजरी करण्यास मनाई करण्यात आली आहे. आदेशामधील कोणत्याही तरतुदीचा भंग केल्यास संबंधिताविरुद्ध कारवाई करण्यात येणार असल्याचेही जिल्हाधिकारी यांनी आदेशात म्हटले आहे.