– डॉ. मानसी पाटील-गुप्ता
“खळखळून हसणे, पुरेशी झोप आणि आरोग्यदायी आहार हा जंतुसंसर्ग (इन्फेक्शन्स) टाळण्याचा कानमंत्र आहे!”
जंतू आपल्या सभोवताली सगळीकडे असतात… अगदी आपण कल्पनाही करू शकणार नाही इतक्या स्वच्छ ठिकाणी सुद्धा!! आपल्या लहानग्यांना जंतुसंसर्गापासून वाचवण्यासाठी सर्व जंतू मारून टाकता येतील असा एकही उपाय अस्तित्वात नाही. संरक्षण हवेच असेल तर ते आपल्या ’आतून’ यायला हवे. यासाठी जरी जन्मतःच आपल्याला काही प्रमाणात प्रतिकारशक्ती मिळत असली तरी तिला मजबूत करण्याचे काम आपल्यालाच करावे लागते.
लहान मुलांना जंतुसंसर्ग चटकन होतो. त्यांचे शरीर अजून आजारांशी लढा देणे शिकत असल्यामुळे कोणत्याही जंतुसंसर्गाचा परिणामही मुलांवर जास्त प्रमाणात होतो. त्यानंतर मात्र शरीर त्या ठराविक जंतूंशी लढण्याची पद्धत लक्षात ठेवते म्हणजेच आपली प्रतिकारशक्ती मजबूत होऊ लागते.
लहान आणि वाढत्या वयातला आहार हा लहान मुलांची प्रतिकारशक्ती घडविण्यात मोलाची मदत करतो. गेल्या २५ वर्षांच्या संशोधनानंतर आता हे सिद्ध झाले आहे की चौरस आहार आणि पुरेशी स्वच्छता जंतुसंसर्गाचा धोका कमी करतात. याउलट आहारातील काही पोषणमूल्यांच्या कमतरता, वजन खूप कमी किंवा खूप जास्त असणे यामुळे जंतुसंसर्गाचा धोका वाढतो.
प्रतिकारशक्ती काही एका दिवसात वाढत नाही. ती एक अविरत चालणारी प्रक्रिया आहे. त्यासाठी रोज प्रयत्न करायला हवेत अणि मुख्य म्हणजे आहाराबाबतीत चांगल्या सवयी लावायला हव्यात. सुरूवातीला जरा जड जाईल, पण होईल सवय हळूहळू.
आता मी असे १० अन्नप्रकार सांगणार आहे की ज्यामुळे प्रतिकारशक्ती सुधारेल.
१. लिंबूवर्गीय फळे (लिंबू, संत्री, मोसंबी, ग्रेप-फ्रूट)
ही फळे ’क’ जीवनसत्व देतात. क जीवनसत्व शरीरातील सूज कमी करायला मदत करते. या फळांमध्येquercetin, rutin, hesperidin, apigenin,tangeretin नावाची अनेक अॅन्टीऑक्सिडंट्स(flavonoids) सुद्धा असतात जी प्रतिकारशक्ती वाढायला मदत करतात. याशिवाय ’क’ जीवनसत्व त्वचेचे आरोग्य राखते. त्वचा ही तर जंतूंना दूर ठेवण्यासाठीचे आपल्या शरीराचे पहिले सुरक्षाकवच आहे!
२. बेरी वर्गातील फळे
किवी, स्ट्रॉबेरी, आवळा,करवंदे यासारख्या फळांचे सेवन केल्याने प्रतिकारशक्ती वाढते. या फळांच्या रंगांमधील रंगद्रव्ये जंतूंचा नायनाट करतात. या फळांमध्ये काही प्रमाणात ’क’जीवनसत्वदेखील असते जे प्रतिकारशक्ती वाढवते.स्ट्रॉबेरी, रास्पबेरी, डाळिंब या फळांमधले एलेग्जिक आम्ल (Ellagic acid) आपल्या यकृतातील घातक घटक नष्ट करते. एक मात्र कर, ही फळे देण्यापूर्वी अनयाला बेरींची अॅलर्जी नाही ना याची खात्री कर.
३. लाल रंगाची फळे
या फळांतील लाल रंग म्हणजेच लायकोपीन (Lycopene) नावाचे रंगद्रव्य आणि अॅन्टीऑक्सिडंट. हे टॉमॅटो, गुलाबी ग्रेप-फ्रूट, कलिंगड या फळांमध्ये भरपूर असते. या फळांमुळे शरीरातिल दूषित घटकांचा नायनाट होऊन प्रतिकारशक्ती वाढते.यामुळे शरीरातील विशिष्ट प्रकारच्या पांढर्या पेशी (T-lymphocytes व B-lymphocytes) कार्यक्षम होतात आणि शरीरात प्रतिद्रव्ये (antibodies वcytokines) तयार होतात.
४. हिरव्या पालेभाज्या
या तर फार महत्वाच्या आहेत.यांत Lutein, Zeaxanthin नावाची अॅन्टीऑक्सिडंट्स असतात जी प्रतिकारशक्ती वाढायला मदत करतात. पालेभाज्या म्हणजे जीवनसत्वे (के जीवनसत्व, अ जीवनसत्व, फोलेट, क जीवनसत्व),खनिजद्रव्ये (मॅंगेनीज, पोटॅशिअम, मॅग्नेशिअम) आणि तंतूमय पदार्थ यांचे भांडारच! ही सर्व पोषकद्रव्ये प्रतिकारशक्तीसाठी फार महत्वाची आहेत. शिवाय प्लीहा(Spleen), थायमस (Thymus) आणि थायरॉईड(Thyroid) ग्रंथींचे काम सुरळीत चालण्यासाठीसुद्धा ही पोषकद्रव्ये महत्वाची आहेत. या ग्रंथी प्रतिद्रव्यांचे (antibodies) उत्पादन आणि साठा करतात.
५. पांढर्या – पिवळ्या भाज्या व फळे
पपई, लाल भोपळा, पेरू, केळी, गाजर, रताळी यांसारख्या फळे व भाज्यांमधून कॅरोटिनॉईड्स, अ जीवनसत्व, ब-६ जीवनसत्व, फोलेट, तंतूमय पदार्थ आणि सेलेनिअम यासारखे विषाणूंच्या विरोधात लढणारे घटक मिळतात.विशेषतः फ्लू सारख्या आजारांमध्ये हे घटक फार उपयोगी ठरतात.
६. पाणी व द्रवपदार्थ
पाणी आपल्या शरीरातले दूषित घटक बाहेर टाकायला मदत करते. आपल्या शरीरातील पेशींच्या चयापचयादरम्यान तयार होणारे अनावश्यक घटकही बाहेत टाकायला पाणी मदत करते आणि पेशींची ऑक्सिजन घेण्याची क्षमता वाढवते. यामुळे प्रतिकारशक्ती वाढायला मदत होते. लहान मुलांनी दररोज साधारण १ ते १.५ लिटर पाणी व द्रवपदार्थ प्यायला हवेत. यात दूध, ताक, सरबत, ज्यूस या सर्वांचा समावेश आहे. लहान मुलांच्या शरीरातील पाण्याचे प्रमाण पटकन कमी होते. त्यामुळे मुलांनी थोड्या थोड्या वेळाने सारखे पाणी घ्यायला हवे. हे करण्याचा सोप्पा उपाय म्हणजे त्यांना स्वतःची छानशी बाटली द्या आणि त्यातले पाणी संपवायला सांगा!
जरी ज्यूस-सरबतांपेक्षा साधे पाणी पिणे हा उत्तम पर्याय असला तरी काही मुलांना नुसते पाणी प्यायला आवडत नाही. अशावेळी वेगवेगळ्या चवींचे पाणी (ताज्या फळांचा थोडासा रस घालून) द्यायला हरकत नाही. केवळ ज्यूस देणे चांगले नाही कारण त्यातून साखर आणि उष्मांकच पोटात जातात. त्यात तंतूमय पदार्थांचा आभाव असतो. आणि सारखे ज्यूसेस घेतल्यामुळे वजन वाढू शकते, जुलाब होऊ शकतात आणि दातही किडू शकतात.
७. सुकामेवा (nuts) व तेलबिया
यात चांगल्या प्रतीची प्रथिने व स्निग्ध पदार्थ असतात. शिवाय सेलेनिअम, मॅग्नेशिअम, लोह, कॅल्शिअम, तांबे,मॅंगेनीज, तंतुमय पदार्थ, ’अ’ व ’ई’ जीवनसत्व यासारखे पोषक घटकसुद्धा असतात. हेजेल नट्स आणि दूध हे एकत्र घेतल्यास शरीराची झीज भरून निघते आणि लाल रक्तपेशी वाढायला मदत होते. अक्रोडामध्ये ’ओमेगा-३’ प्रकारची मेदाम्ले असतात. अक्रोड रात्रभर पाण्यात भिजवून खाल्ले तर शरीरातील सूज कमी होते. चेस्टनट शरीरातील लहान रक्तवाहिन्यांचे आरोग्य सुधारतात आणि जंतुसंसर्ग झालेल्या भागाचा रक्तपुरवठा सुधारतात. मुलांनी साधारण अर्धी मूठ भरून जरी सुकामेवा दररोज खाल्ला तरी पुष्कळ आहे.
८. मांसाहारी पदार्थ
अंडी, मासे, चिकन यातून मुलांना उत्तम प्रतीची प्रथिने मिळतात जी प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी महत्वाची असतात. यातील अर्जिनीन,ग्लुटामाईन आणि सिस्टीनसारखी अमायनो आम्ले शरीरातील लढाऊ पांढर्या पेशींचे काम सुरु करण्यासाठी मदत करतात. याशिवाय मिथिओनिन,ग्लुटामेट आणि थ्रिओनिन सारखी अमायनो आम्ले आतड्यांमधून मिळणार्या प्रतिकारशक्तीला अधिक बळकटी आणतात. ही सर्व अमायनो आम्ले आतड्यांचे आरोग्य राखतात, गरज पडल्यास त्याची दुरुस्ती करतात, काही विशिष्ट पांढर्या पेशींची (T-lymphocytes) संख्या वाढवतात आणि काही प्रतिद्रव्यांच्या (immunoglobulin) निर्मितीसही हातभार लावतात. याशिवाय प्रथिनांचा फायदा म्हणजे प्रथिनांमधील ब्रान्च्ड चेन अमायनो आम्ले जंतूसंसर्ग झाला असताना पांढर्या पेशींच्या निर्मितीसाठी आवश्यक असतात.
९. ग्रीक योगर्ट
यात प्रथिने तर असतातच शिवाय मित्रजीवाणू (probiotics) देखील असतात. लहान मुलांची जवळपास ५०% प्रतिकारशक्ती त्यांना ते त्यांच्या आतड्यांपासून मिळत असते. ग्रीक योगर्ट मधील मित्रजीवाणू आतड्यांमधील हानिकारक जीवाणूंशी दोन हात करतात. ग्रीक योगर्ट पचायलाही हलके असते आणि त्यात लॅक्टोजचे प्रमाणदेखील कमी असते ज्यामुळे लॅक्टोज न पचणार्या मुलांनादेखील चालते.
१०. खजूर आणि अंजीर
यात लोह, मॅंगेनीज,कॅल्शिअम, फॉस्फरस, झिंक, तंतूमय पदार्थ, फोलेट,’अ’ जीवनसत्व पुष्कळ प्रमाणात असते. प्रतिकारशक्ती वाढण्यासाठी आणि जंतूसंसर्गातून लवकर बरे होण्यासाठी ही घटकद्रव्ये मोलाची मदत करतात.