मुंबई – देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आंतरराज्य प्रवास करणाऱ्या मुंबई ते शिर्डी आणि मुंबई ते सोलापूर या दोन वंदे भारत एक्सप्रेसला आज (10 फेब्रुवारी) हिरवा कंदील दाखवला जाणार आहे. आणि त्यासाठीच शुक्रवारी म्हणजेच, आज दुपारी पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबई दाखल होती. उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊ येथून मोदी मुंबईत पोहोचणार आहेत. यावेळी पंतप्रधान मोदी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून दोन वंदे भारत एक्स्प्रेसला हिरवा कंदील दाखवतील.
दरम्यान, पंतप्रधानांच्या आगमनप्रसंगी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंबई विमानतळावर उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर दुपारी 3 वाजता पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते सीएसटी येथे 2 वंदे भारत ट्रेनचा शुभारंभ आणि मुंबईतील विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन होईल. त्यानंतर दुपारी 4.45 वाजताच्या दरम्यान मोदी यांच्या हस्ते मरोळ येथे सैफी युनिव्हर्सिटीच्या नवीन कँपसचे उद्घाटन होणार आहे. तसेच यावेळी पंतप्रधान मोदी भाजपच्या नेते मंडळींना आणि कार्यकर्त्यांना देखील संबोधित करतील.
सध्या उपलब्ध असलेल्या रेल्वे लाईनवरच वेगवान आणि आरामदायक प्रवासासाठी या रेल्वे बनविण्यात आल्या आहेत. संपूर्णपणे भारतीय बनावटीची ही पहिली सेमीस्पीड रेल्वे असेल. पूर्णपणे एसी, वायफाय, अद्ययावत सस्पेंशन, पूश बैक सीट्स अशी या रेल्वेची खासियत आहे. ही ट्रेन मुंबई ते शिर्डी आणि मुंबई ते सोलापूर अशी धावणार आहे.