मुंबई : विधिमंडळाच्या पायऱ्यांवर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये वाद झाल्यानंतर आता सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करताना दिसत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी आपल्याला शिवीगाळ केल्याचा आरोप केला आहे. तर, दुसरीकडे शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले यांनी अंगावर आलात तर शिंगावर घेऊ आणि हा तर फक्त ट्रेलर होता, चित्रपट अजून बाकी आहे, असा इशारा विरोधकांना दिला आहे.
याविषयी बोलताना, “आम्ही यांचा सगळा इतिहास बाहेर काढला. करोनाचा काळ, सिंचन घोटाळा, नवाब मलिक, अनिल परब यांची वस्तुस्थिती आम्ही मांडली. आमचं झाल्यानंतर पायऱ्या रिकाम्या केल्या असत्या. पण आम्ही बोलत असतानाच गोंधळ घालत लक्ष विचलित करायचं हा कोणता प्रकार आहे. आम्ही काय बांगड्या भरल्या आहेत का? आम्ही जशास तसं उत्तर दिलं आहे. त्यांनी आमचा नाद करायचा नाही. कारण आम्ही कोणाला पाय लावत नाही. चुकून पाय लागला तर आम्ही नमस्कार करु, पण कोणी आम्हाला पाय लावण्याचा प्रयत्न केला तर सोडणार नाही. अंगावर येईल त्याला शिंगावर घेऊ,” असा इशारा शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले यांनी दिला आहे. हा तर फक्त ट्रेलर होता, चित्रपट अजून बाकी आहे असेही त्यांनी यावेळी म्हटले.
आजचे कामकाज सुरु होण्याआधीच सत्ताधारी आणि विरोधकांनी एकमेकांना शिवीगाळ करत धक्काबुक्की केल्याचे पाहायला मिळाले.. विरोधकांकडून ‘५० खोके एकदम ओके अन् खाऊन खाऊन माजलेत बोके!’ अशा घोषणा दिल्या जात होत्या. दरम्यान, सत्ताधारी पक्षाचे आमदार विधीमंडळाच्या पायऱ्यांवर उपस्थित असल्याने विरोधकांनी आमची जागा हायजॅक केल्याचा आरोप केला. यावेळी शिंदे गटातील आमदार महेश शिंदे आणि अमोल मिटकरी यांच्यात जोरदार धक्काबुक्की झाली.