मुंबई : आज अधिवेशन सुरू होण्यापूर्वी विधीमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन करण्याच्या मुद्द्यावरुन सत्ताधारी आणि विरोधक आमदारांमध्ये तुफान राडा झाल्याचे पाहायला मिळाले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी आणि महेश शिंदे यांनी एकमेकाला धक्काबुक्की केली. यावरून विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शिंदे गटातील आमदारांवर सडकून टीका केली आहे. ’पन्नास खोके एकदम ओक्के’ ही घोषणा त्यांना जिव्हारी लागली असून त्यातून हा प्रकार घडला, अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली आहे.
“आम्ही सत्तेवर असतानाही विरोधीपक्ष विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन करत होते. मात्र, आम्ही त्यांना कधी अडवलेले नाही. परंतु आज जाणीवपूर्वक हा प्रकार घडला. महाराष्ट्रात ज्याप्रकारे आमच्या घोषणा दाखवल्या गेल्या, त्याने आपली प्रतिमा मलिन झाल्याची शंका त्यांना आली असावी, ‘चारोच्या मनात चांदणं’ असा हा प्रकार आहे”, असे अजित पवार यांनी म्हटले आहे.
“अधिवेशनाचा उद्याचा शेवटचा दिवस आहे. आम्ही महाविकास आघाडीचे आमदार रोज साडेदहा वाजता विधानभवनाच्या पायऱ्यावर आंदोलन करत असतो, हे सर्व महाराष्ट्राला माहिती आहे. राज्यातील शेतकऱ्यांचे प्रश्न असतील किंवा इतर मागण्या असलतील. त्या विविध घोषणांद्वारे सरकारसमोर मांडत असतो. मात्र, त्यातील ‘पन्नास खोके एकदम ओक्के’ ही घोषणा त्यांना चांगलीच जिव्हारी लागली आणि त्यातून हा प्रकार घडला”, असेही ते म्हणाले.