वॉशिंग्टन : जुळी मुले जन्माला येणे ही जरी वेगळी गोष्ट नसली तरी जेव्हा एखाद्या शाळेच्या एकाच वर्गामध्ये तब्बल 17 जुळ्यांच्या जोड्यांना प्रवेश दिला जातो तेव्हा मात्र ती गोष्ट चर्चेची ठरते. अमेरिकेतील एका शाळेमध्ये एका वर्गामध्ये अशाच प्रकारे सतरा जुळ्यांच्या जोड्यांना प्रवेश देण्यात आला आहे.
पेनसिल्वानिया मधल्या एका किंडर गार्टन स्कूलमध्ये एकाच वेळी या 17 जोड्यांना प्रवेश देण्यात आला, असून 2036 मध्ये हे सर्व विद्यार्थी या शाळेतून ग्रॅज्युएशन पूर्ण करतील कोणत्याही लहान मुलांच्या शाळेमध्ये एखाद्या वर्गामध्ये एक किंवा दोन जुळ्या मुलांच्या जोड्या असणे एक सर्वसाधारण बाब मानण्यात येते, पण एकाच वेळी इतक्या जोड्यांना शाळेत एकाच वर्गात प्रवेश देण्यात आल्याने तो चर्चेचा विषय ठरला आहे.
शाळेमध्ये या सर्व मुलांना प्रवेश दिल्यानंतर शाळेच्या व्यवस्थापनाने या सर्व जुळ्या मुलांना एकत्र बसवून त्यांचे एक छायाचित्र काढले आणि सोशल मीडियावर व्हायरल केले. जुळ्या मुलांच्या या जोड्यांमध्ये काही दोन्ही मुले असून काही ठिकाणी दोन्ही मुले आहेत, तर एक मुलगा आणि एक मुलगी अशा प्रकारच्या जुळ्याच्या जोड्यानीही या शाळेमध्ये प्रवेश घेतला आहे.
जुळी मुले सर्वसाधारणपणे एकसारखी दिसत असली तरी त्यांना शिक्षण देताना कोणताही गोंधळ निर्माण होणार नाही अशी ग्वाही शाळेच्या व्यवस्थापनाने दिली आहे. व्यवस्थापनाने या जुळ्या मुलांच्या पालकांशी सविस्तर चर्चा करून सर्व मुलांची आरोग्यविषयक परिस्थितीही समजून घेतली आहे. परिसरातील नागरिकांसाठी ही घटना औत्सुक्याची असून या शाळेतील या जुळ्या मुलांना बघण्यासाठी लोक गर्दीही करत आहेत.