पुणे – पुण्यात रेमडेसिवीर औषधाची उपलब्धता पुरेशी आहे. त्याचा तुटवडा भासणार नाही, अशी माहिती अन्न व औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त एस. व्ही. प्रतापवार यांनी दिली.
पुणे आणि पिंपरी-चिंचवचडमध्ये सध्या करोना बाधितांची वाढणारी संख्या चिंताजनक झाली आहे. मात्र, ही संख्या वाढणार असल्याचा अंदाज केंद्रीय पथकाने याआधीच व्यक्त केला आहे. त्यानंतर सर्व स्तरावरील प्रशासनांनी आधीच तयारी सुरू केली आहे. अन्न आणि औषध प्रशासनानेही औषधे आणि ऑक्सिजनचा तुटवडा भासू नये यासाठी तयारी आणि उपाययोजना पूर्ण केल्या आहेत.
काही दिवसांमध्ये कमी झालेली बाधितांची आकडेवारी दीडशे वरून आता पाचशेपेक्षा जास्त झाली आहे. पुढील आठवड्यापर्यंत ती आणखी वाढण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर तयारीचा भाग म्हणून, करोनावर उपयुक्त ठरलेले रेमडेसिवीर या इंजेक्शनचा तुटवडा यंदा भासू देणार नाही. त्याचा मुबलक साठा आणि योग्य प्रकारे वितरणाची व्यवस्था अन्न आणि औषध प्रशासनाकडून करण्यात आल्याचे प्रतापवार म्हणाले.
याशिवाय अन्य औषधे, रुग्णालयांसाठी आवश्यक गोष्टींचीही पूर्तता करण्यात आली असून, त्या पुरवण्यासाठी मूलभूत यंत्रणाही सज्ज करण्यात आल्या आहेत. कोणत्याही प्रकारे औषधांचा काळाबाजार होणार नाही, याकडे लक्ष केंद्रीत करण्यात आले असून, त्यासाठी स्वतंत्र यंत्रणाही राबवण्यात आल्याचे प्रतापवार यांनी नमूद केले. करोनाच्यापहिल्या टप्प्यात यंत्रणा उभी करण्याला बराच कालावधी गेला. मात्र, आता आधीच यंत्रणा सज्ज असल्याने औषधे तळागाळापर्यंत पोहोचवणे शक्य असल्याचेही ते म्हणाले.