काबुल : अफगाणिस्तानवर ताबा घेतल्यानंतर तालिबान लवकरच सरकार स्थापन करणार आहे. त्यामुळे या मोठ्या घडामोडीवर जगाचे लक्ष होते. दरम्यान तालिबान अमेरिकेला डिवचत दहशतवादी हल्ल्याची आठवण करुन देणाऱ्या ९/११ रोजीच सरकार स्थापन करणार असल्याचे बोलले जात होते. मात्र आता दबावामुळे ताबिलानकडून ११ सप्टेंबरला सरकार स्थापनेचा कार्यक्रम रद्द करण्यात आल्याची माहिती मिळत आहेत.
रशियामधील एका संकेतस्थळाने यासंदर्भात वृत्त दिले आहे. १६ ऑगस्टपासून तालिबानने देशामधील सत्ता काबीज केली आहे. ११ सप्टेंबर २०२१ रोजी अमेरिकेतील वर्ल्ड ट्रेड सेंटरवर झालेल्या सर्वात मोठ्या दहशतवादी हल्ल्याला २० वर्ष पूर्ण होत आहेत. याच तारखेला २० वर्षांपूर्वी ओसामा बिन लादेनच्या नेतृत्वाखाली हल्ला केला होता. त्यानंतरच अमेरिकेने आपल्या लष्करासहीत अफगाणिस्तानवरील तालिबानच्या तळांवर हल्ला करत पहिल्यांदा अफगाणिस्तानच्या भूमीवर पाऊल ठेवले होते. त्यावेळी अफगाणिस्तानमध्ये तालिबानचे सरकार होते.
अमेरिकेने त्यानंतर अफगाणिस्तानमध्ये सत्तांतर घडवून आले होते . हा संघर्ष २० वर्षे चालला अखेर अमेरिकने मागील आठवड्यामध्ये आपलं संपूर्ण सैन्य अफगाणिस्तानमधून मागे घेत असल्याची घोषणा केलीय. याच सर्व संघर्षाच्या पार्श्वभूमीवर तालिबान आता पुन्हा एकदा सत्ता स्थापनेची घोषणा ९/११ करुन अमेरिकेला पुन्हा एकदा डिवचण्याचा प्रयत्न करणार असल्याचे बोलले जात होते.
“काही दिवसांपूर्वी अफगाणिस्तान सरकार स्थापनेचा कार्यक्रम रद्द करण्यात आला होता. लोकांमध्ये कोणतंही गोंधळाचं वातावरण असू नये यासाठी नेतृत्वाने मंत्रीमंडळाच्या काही भागाची घोषणा केली असून त्यांनी काम सुरुदेखील केलं आहे,” अशा माहिती अफगाणिस्तान सरकारमधील सांस्कृतिक मंत्री इनामुल्ला यांनी दिली आहे. तालिबानने सरकार स्थापनेच्या कार्यक्रमात रशिया, इराण, चीन, कतार आणि पाकिस्तानला निमंत्रण दिले होते. रशियाने मात्र कार्यक्रमात सहभागी होण्यास नकार दिला होता.
अफगाणिस्तानला आताच्या परिस्थितीत एकटे पाडून कोंडी करण्याचा प्रयत्न केल्यास त्याचे गंभीर परिणाम होतील असे पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शहा महमूद कुरेशी यांनी म्हटले आहे. आंतरराष्ट्रीय समुदायाने पाकिस्तानबाबत सकारात्मक दृष्टिकोन अवलंबावा असे सांगून ते म्हणाले की, अफगाणिस्तानला जर जगाने वेगळे पाडण्याचे प्रयत्न केले तर त्याचे फार गंभीर परिणाम अफगाणी लोकांवर तसेच जगावर होतील.