माहितीपट मानवी अधिकाराबाबत- ग्रीन पक्षाचे मत
सिडनी – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कारकिर्दीवर आधारित असलेला “बीबीसी’ने तयार केलेला वादग्रस्त माहितीपट ऑस्ट्रेलियाच्या संसदेमध्ये प्रसारित करण्यात आला आहे. मोदी ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावरून परतल्यानंतर लगेचच हा माहितीपट ऑस्ट्रेलियाच्या संसदेमध्ये दाखवण्यात आला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ऑस्ट्रेलिया भेटीदरम्यान भारतातील मानवाधिकारांच्या मुद्द्यावर त्यांच्याशी चर्चा न केल्याबद्दल ऑस्ट्रलियाचे पंतप्रधान ऍन्थनी अल्बानीस यांच्या विरोधात रोष असल्याचे मत ग्रीन पार्टीचे संसद सदस्य जॉर्डन स्टील जॉन यांनी मांडले. अल्बानीस यांनाही ही टीका स्वीकारायची इच्छा असणार, असेही ते म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी 3 दिवस ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर होते. त्या भेटीदरम्यान त्यांनी ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान आणि अन्य नेत्यांशी द्विपक्षीय चर्चाही केली होती. सिडनीमध्ये मोदी आणि अल्बानीस यांच्या उपस्थितीत झालेल्या समारंभाला किमान 20 हजार जण उपस्थित राहिले होते. बुधवारी सिडनीतील ऑपेरा हाऊसमध्ये झालेल्या समारंभाला भारतीय राष्ट्रध्वज हातात घेतलेल्या हजारो नागरिकांनी “मोदी मोदी’ असा जयघोष केला होता. तर ऑस्ट्रेलियाच्या संसदेमध्ये “बीबीसी’चा माहितीपट दाखवण्याच्या कार्यक्रमाचे सहआयोजक ऍम्नेस्टी इंटरनॅशनल या संस्थेकडे होते. या कार्यक्रमाला किमान 50 जण उपस्थित राहिले होते.
2002 साली गुजरातमध्ये झालेल्या दंगलीत मोदींचा सहभाग असल्याचे या माहितीपटाद्वारे दाखवण्यात आले आहे. गुजरात दंगलीमध्ये किमान 1 हजार जण मारले गेले होते. त्यापैकी बहुतेक जण मुस्लीम होते. या दंगलीच्यावेळी गुजरातचे मुख्यमंत्री असलेल्या मोदींनी या दंगलींमधील सहभागाचा आरोप फेटाळला आहे. गुजरात दंगलींचा तपास करण्यासाठी नियुक्त केलेल्या विशेष तपास पथकाने 2012 साली मोदींविरोधात कोणताही पुरावा नसल्याचा निष्कर्ष काढून त्यांना या दंगलीतील सहभागाच्या आरोपातून मुक्त केले आहे. “बीबीसी’ने केलेल्या या माहितीपटामध्ये तथ्य नसल्याचे सांगून भारतात या माहितीपटावर मोदी सरकारने बंदी घातली आहे.