नवी दिल्ली – दिल्ली मद्य धोरण घोटाळ्याशी संबंधित प्रकरणांत सत्तारूढ आम आदमी पक्षाला (आप) आरोपी बनवण्याविषयी विचार सुरू आहे, अशी माहिती सोमवारी सीबीआय आणि ईडीने सर्वोच्च न्यायालयात दिली. त्यामुळे आपच्या अडचणी वाढण्याची चिन्हे आहेत.
मद्य धोरण घोटाळ्याशी संबंधित भ्रष्टाचार प्रकरणाचा तपास सीबीआय, तर मनी लॉण्डरिंग प्रकरणाची चौकशी ईडी करत आहे. त्या प्रकरणी दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया आणि खासदार संजय सिंह या आपच्या नेत्यांना अटक झाली.
सर्वोच्च न्यायालयात सध्या सिसोदिया यांनी जामिनासाठी दाखल केलेल्या स्वतंत्र याचिकांवर सुनावणी सुरू आहे. मागील सुनावणीवेळी न्यायालयाने ईडीने केलेल्या दाव्यावरून त्या केंद्रीय यंत्रणेला एक सवाल केला होता. घोटाळ्याचा लाभार्थी राजकीय पक्ष (आप) असेल; तर त्या पक्षाला आरोपी का करण्यात आले नाही, अशी विचारणा न्यायालयाने केली होती.
त्या प्रश्नाचे उत्तर ताज्या सुनावणीवेळी सीबीआय आणि ईडीची बाजू मांडणारे अतिरिक्त सॉलिसिटर जनरल एस.व्ही.राजू यांनी दिले. आपला आरोपी बनवण्याविषयी विचार सुरू असल्याचे त्यांनी नमूद केले. त्यावर सीबीआय आणि ईडीकडून तपास सुरू असलेल्या प्रकरणांत आपविरोधात भिन्न आरोप ठेवले जाणार का यावर न्यायालयाने राजू यांना उद्या (मंगळवार) स्पष्टीकरण देण्यास सांगितले.