शेतातील साहित्यांवर डोळा : बळीराजाची डोकेदुखी वाढली
बेल्हे (पुणे)- बेल्हे (ता. जुन्नर) येथील औटीमळ्यात गेल्या तीन दिवसांपासून चोरट्यांचा सुळसुळाट झाला आहे. हे चोरटे रात्रीच्यावेळी शेतकऱ्यांच्या बोअरबेलमधील विद्युत मोटार, तांब्याची केबल, दोरी (रस्सी), स्टार्टर लंपास करीत असल्याने शेतकऱ्यांची डोकोदुखी वाढली आहे. आधीच शेतमालाला भाव नाही, त्यात पाऊस, करोनामुळे आधीच वैतागलेल्या बळीराजाला आता चोरट्यांच्याही त्रासाला सामोरे जावे लागत असल्याने तो वैतागला आहे. याबाबत आळेफाटा पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
योगेश औटी या शेतकऱ्यांने 3 महिन्या पूर्वी आपल्या बोअरवेलमध्ये 5 एचपीची मोटार बसवली होती. त्यांच्या बोअरवेलमधील मोटार, केबल, दोरी, स्टार्टर असा 30 ते 35 हजार रुपयांचे साहित्य रविवारी (दि.13) रात्री चोरीला गेला आहे. तर शैलेश ढवळे व बबन औटी यांच्याही बोअरवेलमधील साहित्य चोरी गेले आहे. जालिंदर औटी या शेतकऱ्यांच्या मोटारीचा स्टार्टर शुक्रवार (दि. 11) चोरी गेला आहे. तरी याबाबत पोलिसांनी त्वरीत दखल घेऊन चोट्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. दरम्यान, मे महिन्यात अणे पठारावरील पेमदरा, भोसलेवाडी, कारेवाडी, शिंदेवाडी या परिसरात मोटार चोरट्यांनी थैमान घातले होते.