खडकवासला – सिंहगडावर खाद्यपदार्थ विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या एका इसमाने गडावर आणलेल्या महागड्या मशीन चोरून मातीमोल भावाने विकल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. सिंहगडावर कचरा प्रकल्पासाठी आणलेली तब्बल साडेसात लाखांची मशिनरी चोरीस गेल्याची घटना घडली होती. या मशिनरीच्या चोरीचा उलगडा करण्यात पुणे ग्रामीण पोलिसांना यश आले आहे. पोलिसांनी या प्रकरणी ९ पैकी ६ आरोपींना अटकही केली आहे. सिंहगडावरीर एक खाद्यपदार्थ विक्रेताच या चोरीचा ‘मास्टर माईंड’ असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
चोरीत सहभागी असलेल्या महाभागांनी साडेसात लाखांचे साहित्य केवळ पंधरा हजार रुपयांना एका भंगार व्यावसायिकाला विकले असल्याचेही पुढे आले आहे. या भंगार व्यावसायिकालाही पोलीसांकडून आता अटक करण्यात आली आहे.
नेमका काय आहे प्रकार?
सिंहगडावरील गाडीतळावर कचरा प्रक्रिया प्रकल्पासाठी बसविण्यात आलेले महागडे साहित्य चोरीला गेल्याची घटना २२ डिसेंबर रोजी उघडकीस आल्यानंतर वन विभागाने हवेली पोलीस ठाण्यात याबाबत अज्ञात चोरट्यांच्या विरोधात तक्रार दाखल केली होती. संबंधित ठिकाणी कोणीही प्रत्यक्षदर्शी किंवा सीसीटीव्ही कॅमेरे नसल्याने चोरीचा तपास करण्याचे आव्हान पोलिसांसमोर होते.
पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी हवेली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांना तातडीने एकत्रित तपास करुन गुन्हा उघड करण्याच्या सूचना दिल्या होत्या. हवेली पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक निरंजन रणवरे व स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नेताजी गंधारे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस हवालदार अजित भुजबळ,राजू मोमिन, पोलीस नाईक गणेश धनवे, अमोल शेडगे, राजेंद्र मुंढे, बाळासाहेब खडके, पोलीस कॉन्स्टेबल मंगेश भगत,दगडू विरकर, रजनीकांत खंडाळे यांचे पथक सलग पंधरा दिवस याचा तपास करत होते.
तांत्रिक विश्लेषणाने झाला पडदाफाश
सिंहगडावर जाणाऱ्या खेडशिवापूर व डोणजे या दोन्ही बाजूंच्या रस्त्यांचे तांत्रिक विश्लेषण केल्यानंतर काही संशयित फोन कॉल झाल्याचे तपास पथकाला आढळून आले. त्यानुसार सुनिल शिवाजी चव्हाण (वय 23 रा.मोरदरी ता. हवेली), आकाश काळुराम चव्हाण (वय 25, रा. मोरदरी, ता. हवेली), दादा बबन चव्हाण (वय 36, रा. शिंदेवाडी ता. भोर), शुभम रोहिदास भंडलकर (वय 23 रा. माहुर ता. पुरंदर),शंभु दत्तात्रय शितकल (वय 22, माहुर ता. पुरंदर) व सहिमुद्दीन सज्जाद अली साह (वय 30, रा. गुजर निंबाळकवाडी, ता हवेली, भंगार व्यावसायिक) या सहा जणांना अटक करण्यात आली असून तीन आरोपी अद्याप फरार आहेत.
चोरीचे मोठे रॅकेट असण्याची शक्यता
तसेच यात अजूनही काही आरोपी सामील असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक निरंजन रणवरे याबाबत अधिक तपास करत आहेत. चोरीचे हे रॅकेट असण्याची शक्यता असून ते उघड करण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.
गडावरील खाद्यपदार्थ विक्रेत्याने रचला कट.
आरोपी सुनील चव्हाण याचे सिंहगडावर खाद्यपदार्थ विक्रीचे दुकान आहे. कचरा प्रक्रिया प्रकल्पासाठी आलेले साहित्य त्याने पाहिले व त्याच्या इतर सहकाऱ्यांना ‘चांगला माल’ असल्याची माहिती दिली. गडावर कोणत्या वेळी कोण असतं याची खडानखडा माहिती असल्याने सुनीलने कोणत्या दिवशी व कोणत्या वेळी चोरी करायची याचा कट रचला. एक पिकअप गाडी भाड्याने घेण्यात आली व साहित्याची चोरी करुन साडेसात लाखांचे साहित्य ३० रुपये किलो दराने केवळ पंधरा हजारांना विकण्यात आले