सातारा, (प्रतिनिधी) – सातारा आणि पुणे जिल्ह्यांमध्ये चोर्या करणारा सराईत गुन्हेगार अमित बजरंग चव्हाण (मूळ रा. कुडाळ, ता. जावळी, सध्या रा. खेड शिवापूर, जि. पुणे) यास भुईंज पोलिसांनी कुडाळ येथून अटक केली. तीन डीपींमधून चोरलेल्या तांब्याच्या तारा, दोन मोटारसायकली, असा दोन लाख 44 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
देगाव, बोपेगाव आणि किकली येथील विद्युत ट्रान्सफॉर्मर खाली पाडून, त्यातील तांब्याच्या तारा चोरीला गेल्या होत्या. यासंबंधी भुईंज पोलीस ठाण्यात गुन्हे नोंदवण्यात आले होते.
या गुन्ह्यांच्या तपासाबाबत पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी वाईचे पोलीस उपअधीक्षक बाळासाहेब भालचिम यांना सूचना दिल्या होत्या. भालचिम यांच्या निर्देशांनुसार भुईंज पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश गरजे, पोलीस उपनिरीक्षक विशाल भंडारे, रत्नदीप भंडारे, सहाय्यक फौजदार टकले, नितीन जाधव, सोमनाथ बल्लाळ, किरण निंबाळकर, सागर मोहिते यांच्या पथकाने संशयित अमित चव्हाण याची माहिती मिळवली. तो खेड शिवापूर येथे वास्तव्यास असून, तो वारंवार कुडाळ येथे येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
त्यानुसार पोलीस पथकाने सापळा रचून, त्याला दि. 9 रोजी अटक केली. त्याने साथीदारांसह तांब्याच्या तारांच्या चोरीचे तीन गुन्हे कबूल केले. हॉटेल विरंगुळाशेजारचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न आणि पुणे जिल्ह्यातील पौड पोलीस ठाण्याच्या हद्दीतून दोन मोटारसायकली चोरल्याचीही कबुली दिली. अमित चव्हाण याच्यावर सातारा आणि पुणे जिल्ह्यात दरोडा, जबरी चोरी, बलात्कार, एटीएम चोरीचा प्रयत्न, असे नऊ गुन्हे दाखल आहेत. त्याच्या साथीदारांचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.