आमदार जगतापांच्या रॅलीत चोरांची हातसफाई

रोख रक्कम, मोबाईल व सोनसाखळींवर डल्ला

नगर: अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदार संघाचे कॉग्रेस-राष्ट्रवादी कॉग्रेस आघाडीचे उमेदवार आमदार संग्राम जगताप यांनी मुहूर्त साधून मंगळवारी दुपारी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यासाठी त्यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन केले. हाच मुहूर्तसाधून चोरांनी त्यांच्या शहरातील रॅलीत हात की सफाई दाखवित धुमाकूळ घातला. चोरांनी रॅलीतील तब्बल 20 जणांची सोनसाखळी, मोबाईल व रोख रकमेवर डल्ला मारला. कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल झाली असून दोन संशयित चोरांना ताब्यात घेण्यात आले आहे.पोलीस निरीक्षक विकास वाघ यांनी या प्रकाराची दखल घेत या चोरांकडे चौकशी सुरू केली आहे.

संग्राम जगताप यांच्या निघालेल्या शक्तिप्रदर्शन रॅलीत मोठी गर्दी झाली होती. या गर्दीचा फायदा चोरांनी घेतला. रॅली माळीवाडा वेशीजवळ आल्यानंतर 10 ते 12 चोरटे या रॅलीत घुसले. रॅलीत सहभागी झालेल्यांचे मोबाईल, सोनसाखळीवर हातसफाई केली. रॅली कापडबाजारात आल्यानंतर बाजारातील व्यापारी रॅलीत सहभागी झाले. चोरांनी मोबाईल व रोख रकमेवर डल्ला मारला. चोरांनी 60 ते 70 लाखाच्यावर ऐवजावर डल्ला मारल्याची माहिती समोर येत आहे.

एका व्यापाऱ्याच्या खिशात हात घालत असताना एका भामट्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. लोकांनी एकाला संशयावरून पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. या चोराने पाथर्डी येथील नाथनगरचा रहिवाशी असल्याचे सांगितले. पोलीस त्याच्याकडे चौकशी करत होते. सभा संपल्यानंतर चोरी झालेल्या अनेकांनी पोलीस ठाण्यात येऊन आपली चोरी झाल्याचे पोलिसांना सांगत होते. पोलिसांनी एकच फिर्याद दाखल करून इतरांची नावे व चोरीस गेलेली रक्कम फिर्यादीत नोंद करून घेतली.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.