राज्यातील विविध मतदारसंघांमध्ये 28 एप्रिलपर्यंत राबविणार अभियान
मुंबई: लोकसभा निवडणुकांमध्ये मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी निवडणूक आयोगाकडून मतदार जागृतीचे कार्यक्रम मोठ्या प्रमाणावर आयोजित केले जात आहेत. त्याअंतर्गत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे‘महा मतदार जागृती अभियाना’चा प्रारंभ राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी अश्वनी कुमार यांच्या हस्ते आज झाला.
केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयांतर्गत क्षेत्रीय बाह्य प्रचार कार्यालय, महाराष्ट्र व गोवा यांच्यातर्फे (रिजनल आऊटरीच ब्युरो) हे अभियान राबविण्यात येत आहे. अभियानाच्या उद्घाटनप्रसंगी ब्युरो ऑफ आऊटरीच ॲण्ड कम्युनिकेशन,नवी दिल्लीचे महासंचालक सत्येंद्र प्रकाश, माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या पश्चिम विभागाचे महासंचालक आर. एन. मिश्रा, रिजनल आऊटरीच ब्युरोचे अतिरिक्त महासंचालक डी. जे. नारायण आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचा प्रारंभ श्री. कुमार यांच्या हस्ते फित कापून करण्यात आला. यावेळी श्री. कुमार यांच्या हस्ते मतदार जागृती अभियान वाहनाला झेंडी दाखवून रवाना करण्यात आले. हवेमध्ये फुगे सोडून मतदार जागृती अभियानात सर्वांनी सहभागी होण्याचा संदेश दिला गेला.
संगीत आणि नाट्य विभागातर्फे (साँग अँड ड्रामा डिव्हिजन) मतदान जनजागृतीसाठी ‘एक पाऊल लोकशाहीचे’ हे पथनाट्य आणि लोकसंगीत कायक्रमाचे आयोजनही यावेळी करण्यात आले.
मुंबई दक्षिण, पुणे, नागपूर, चंद्रपूर, सोलापूर, सातारा, औरंगाबाद, जळगाव, धुळे आणि कल्याण मतदारसंघामध्ये दि. 2 ते 28 एप्रिल, 2019 या दरम्यान हे अभियान राबविण्यात येणार आहे.