लखनौ – बहुजन समाज पार्टीने कॉंग्रेसची साथ नाकारल्याबद्दल नाराजी व्यक्त केलेल्या राहुल गांधी यांच्यावर बसपा नेत्या मायावती यांनी कडवट शब्दात टीका केली आहे. राहुल गांधी यांनी इतर पक्षांबद्दल काळजी करण्यापूर्वी आपल्या पक्षाची काळजी करावी, असे मायावती म्हणाल्या.
उत्तर प्रदेैशातील विधानसभेच्या निवडणुकीसाठी कॉंग्रेस पक्षाने बसपापुढे आघाडीचा प्रस्ताव ठेवला होता. या आघाडीसाठी बसपा नेत्या मायावती यांच्यापुढे मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवारीचा पर्यायही ठेवण्यात आला होता. मात्र मायावती यांनी या प्रस्तावाला प्रतिसाद दिला नाही, असे राहुल गांधी शनिवारी म्हणाले होते.
सीबीआयच्या दहशतीमुळे मायावती गप्प बसल्या आहेत, असे विधान काल कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी केले होते. त्यावर आज मायावती यांनी जोरदार पलटवार केला आहे. राहुल गांधी यांनी आधी आपले घर नीट करावे मगच आमच्याबाबत त्यांनी बोलावे, असे मायावती यांनी म्हटले.
आम्ही आमचे सरकार सत्तेवर असताना दलितांच्या उन्नतीसाठी खूप प्रयत्न केला पण कॉंग्रेस सरकारच्या काळात दलितांच्या उत्थानासाठी त्यांनी काहीही केले नाही असा आरोपही त्यांनी केला. आमचे सरकार सत्तेवर असताना कॉंग्रेसने आंदोलने करून आमच्या सरकारच्या कामात अडथळे आणले होते असेही मायावती म्हणाल्या.
आपण ईडी किंवा सीबीआयच्या दबावामुळे गप्प राहिलो आहोत हा कॉंग्रेसचा आरोप त्यांनी फेटाळून लावला. तसेच त्यांनी आपल्याला आघाडीची ऑफर दिली होती त्या दाव्यातही काही तथ्य नाही असे मायावती यांनी म्हटले आहे. कॉंग्रेस नेत्यांनी विरोधकांवर कोणताही आरोप करताना त्याविषयी शंभर वेळा विचार केला पाहिजे. संघ आणि भाजपच्या विरोधात मायावती पूर्ण ताकदीने लढत नाहीत, त्या कारवाईच्या भीतीने गप्प राहिल्या आहेत असे राहुल गांधी यांचे म्हणणे होते.