नवी दिल्ली : देशात चालू महिन्यामध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींमुळे सर्वसामान्यांचे हाल होताना पाहायला मिळत आहे. मात्र, यावरून विरोधकांनी केंद्र सरकारला सातत्याने घेरण्याचा प्रयत्न सुरूच ठेवला आहे. त्यावर आता काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी ट्वीटरवरून निशाणा साधला आहे. आपली भूमिका मांडण्यासाठी त्यांनी एक शेर देखील ट्वीटरवर लिहिला आहे.
वो जुमलों का शोर मचाते हैं,
हम सच का आईना दिखाते हैं।#FuelLoot pic.twitter.com/t8BBZ5cGRN— Rahul Gandhi (@RahulGandhi) February 19, 2021
राहुल गांधींनी या ट्वीटमध्ये केंद्रातील भाजपप्रणीत सरकारवर टीका केली आहे. ‘जून २०१४ मध्ये भाजपचं सरकार आलं, तेव्हा कच्च्या तेलाच्या किंमती ९३ डॉलर प्रतिबॅरल होत्या. तेव्हा पेट्रोल ७१ तर डिझेल ५७ रुपये प्रतिलिटर होतं. गेल्या ७ वर्षांत कच्चं तेल ३० डॉलरने स्वस्त झालंय. पण तरीही पेट्रोल सेंच्युरी करतंय आणि डिझेल त्याच्या पाठपाठ जातंय’, असे या ट्वीटमध्ये त्यांनी म्हटले आहे.
‘२०२१ मध्ये १९ वेळा ही दरवाढ झाली आहे. १५ फेब्रुवारी २०२० ते १५ फेब्रुवारी २०२१ या काळात पेट्रोल १७.०५ तर डिझेल १४.५८ रुपयांनी महाग झालं आहे’, अशी आकडेवारी देखील त्यांनी सादर केली.
दिल्लीत पेट्रोलचे दर ९०.१९ रुपये तर डिझेलसाठी ८०.६० रुपये प्रतिलिटर झाले आहेत. मुंबईत पेट्रेल प्रतिलिटर ९६.६२ रुपये तर डिझेलचे दर ८७ रुपये ६७ पैशांपर्यंत वाढले आहेत. यासोबतच कोलकाता (पेट्रोल-९१.४१) आणि बंगळुरूमध्येही (९३.२१) पेट्रोल नव्वदीपार झाले आहे.