वाघोली – अष्टविनायक मार्ग पैकी एक मार्ग म्हणून थेऊर लोणीकंद हा रस्ता ओळखला जातो या रस्त्यासाठी कोट्यवधी रुपये खर्चून या रस्त्याचे काम संथ गतीने चालू होते याबाबत पुणे जिल्हा भाजप कार्यकारणी च्या वतीने जिल्हाधिकारी व सार्वजनिक बांधकाम विभागाला निवेदन देऊन भाजपने आंदोलनाचा इशारा दिला होता.
या आंदोलनाची दखल घेऊन सध्या थेऊर ते लोणीकंद रस्त्याचे काम प्रगतीपथावर असून जास्तीत जास्त काम चांगले करणेबाबत अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा सुरू असल्याची माहिती भाजप नेते गणेश कुटे यांनी दिली.
अष्टविनायक महामार्गासाठी कोट्यवधी रुपये खर्चून रस्त्यांच्या कामाला तत्कालीन आमदार बाबुराव पाचारणे, तत्कालीन पुणे जिल्हा पालकमंत्री गिरीश बापट, महसूल मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या पाठ पुराव्यातून कोट्यवधी रुपयांचा निधी उपलब्ध झाला होता. सत्तापरिवर्तन झाल्यानंतर या रस्त्याचे काम संथ गतीने चालू होते.
रस्त्याला लागून असलेल्या गावांमधून नागरिकांना ये-जा करणे अवघड झाले होते. याबाबत पुणे भाजप जिल्हा अध्यक्ष गणेश भेगडे यांच्या मार्गदर्शनाखाली भाजप कार्यकारणी च्या वतीने जिल्हाधिकारी व सार्वजनिक बांधकाम विभागाला निवेदन देण्यात आले होते. त्यानंतर कामाला सुरवात होऊन काम वेगात आणि उत्तम दर्जाचे होऊ लागले आहे.
भाजपच्या वतीने महाराष्ट्र राज्य युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील, पुणे जिल्हा भाजप अध्यक्ष गणेश भेगडे, माजी मंत्री संजय भेगडे, यांच्या मार्गदर्शनाखाली रस्त्याचे काम अधिक चांगले करण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा सुरू असून हा रस्ता एक नवी ओळख बनणार असल्याचे महाराष्ट्र प्रदेश भाजप युवा मोर्चा राज्य कार्यकारिणी सदस्य गणेश कुटे यांनी सांगितले.