सिंधुदुर्ग – भाजप नेते नारायण राणे यांनी आज शिवसेनेविरोधात मोठी गर्जना केली आहे. कोकणातून शिवसेनेला हद्दपार करणार असल्याचं सांगत राणे यांनी येथून अकरापैकी एकही आमदार शिवसेनेचा नसेल असं म्हटलंय. ते संधुदुर्ग येथील एका पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते.
उद्धव ठाकरेंवर पुन्हा निशाणा
पत्रकार परिषदेमध्ये बोलताना राणे यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पुन्हा एकदा लक्ष्य केलं. शिवसेनेचे १४५ आमदार निवडून आलेले नाहीत. ठाकरेंनी स्थापन केलेलं सरकार स्वबळावर नाही. उद्धव ठाकरे जर बाहेर पडले तर लोक त्यांना तुमचे किती आमदार असा प्रश्न विचारतील त्यामुळेच ते पिंजऱ्यातून बाहेर पडत नाहीत अशी वक्तव्य त्यांनी केली.
कोकणचा विकास थांबू देणार नाही
यावेळी बोलताना राणे यांनी कोकणातील ११ आमदार कोकणच्या विकासाबाबत का बोलत नाहीत? असा प्रश्न उपस्थित केला. सरकार कोकणाला दिलेला फंड देत नाही तसेच कोकणचे पालकमंत्री निष्क्रिय आहेत असा आरोप त्यांनी केला. आमदार निष्क्रिय असले तरी आम्ही कोकणचा विकास थांबू देणार नसल्याचं आम्ही ठरवलंय असंही ते म्हणाले.
शिवसेनेच्या आमदारांची संख्या घटणार
नारायण राणे यांनी आज शिवसेनेवर पुन्हा एकदा निशाणा साधताना राज्यात ५६ आमदार असलेल्या शिवसेनेचे आमदार घटतील असे भाकीत केले. तत्पूर्वी, दसरा मेळाव्यात बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राणे यांचा उल्लेख बेडूक असा केला होता. यानंतर राणे यांनी पत्रकार परिषद घेत उद्धव ठाकरेंना चांगलंच सुनावलं होत.