नवी दिल्ली – ‘बाबा का ढाबा’च्या मालकाचा युट्यूबवर भावनिक व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर ते कमालीचे प्रसिद्धिझोतात आले होते. त्यांचा दोन दिवसांपूर्वी आणखी एक व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला. त्यात बाबा का ढाबा चे मालक कांता प्रसाद यांनी युट्यूबर गौरव वासन याने आपली फसवणूक केल्याचा आरोप केला. त्यावर युट्यूबर गौरवनं स्पष्टिकरण दिलं आहे.
कांता प्रसाद यांचा भावनिक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर त्यांना अनेकांनी आर्थिक मदत केली होती. ती मदत त्यांच्यापर्यंत पोहोचलीच नाही, युट्यूबर गौरव वासन याने आपले पैसे खाल्ले, असा आरोप कांता प्रसाद यांनी केला होता.
युट्यूबर गौरवने कांता प्रसाद यांनी लावलेले सर्व आरोप फेटाळले आहेत. ‘माझ्यावर लावलेले सर्व आरोप खोटे आहेत, बाबाच्या नावे आम्हाला जे पैसे मिळाले ते आम्ही त्यांनाच दिले. आम्हाला चेकच्या माध्यमातून 2 लाख 33 हजार रूपये, एनईएफटी च्या माध्यमातून 1 लाख रूपये आणि पेटीएमच्या माध्यमातून 45 हजार रूपये मिळाले, ते सर्व पैसे आम्ही बाबाला दिले, असे गौरवने म्हटले आहे.
आम्हाला 25 लाख रूपये मिळाले ही अफवा आहे. ते खरे नाही. बाबांना कोणीतरी यासाठी उद्युक्त केलं आहे, असेही गौरवने म्हटले आहे. आपलं म्हणणं पटवून देण्यासाठी बॅक खात्याचा तपशीलही दिला आहे.
ढाब्याचे मालक कांता प्रसाद यांनी इंस्टाग्राम इन्फ्ल्यूएंसर आणि युट्यूबर गौरव वासन यांच्याविरोधात पौशांचा घोटाळा केल्याची तक्रार दाखल केली होती. गौरवनं कांता प्रसाद यांचा अकाउंट नंबर न देता स्वत:चा अकाउंट नंबर दिला. लोकांनी कांता प्रसाद यांना केलेल्या मदतीचे पैसे गौरवने त्यांना दिले नाहीत. असा आरोप करण्यात आला होता. यावर गौरवनं स्पष्टिकरण दिल्याचे समोर आले आहे.