वॉशिंग्टन – अमेरिकेतील अध्यक्षपदाच्या निवडणूकीत अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याबरोबर डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार ज्यो बिडेन या दोघांनीही विजयाच्या समीप असल्याचा दावा केला आहे. अजून काही महत्वाच्या राज्यांमधील टपालाद्वारे झालेल्या मतांची मोजणी होणे बाकी असल्याने या निवडणूकीचा अंतिम निकाल अद्याप जाहीर झालेला नाही.
ट्रम्प आणि बिडेन या दोघांनाही अपेक्षा असलेल्या राज्यांमध्ये विजय मिळाला आहे. परंतु जॉर्जिया, पेनसिल्वेनिया, नॉर्थ कॅरोलिना आणि नेवाडा या चार राज्यांमधील निकाल जाहीर होणे बाकी आहेत. अद्याप दोघांपैकी कोणत्याही उमेदवाराला विजयी होण्यासाठी आवश्यक असलेल्या 270 इलेक्टोरल कॉलेजची मते मिळाली नाहीत. मात्र बिडेन यांना 264 इलेक्टोरल व्होट मिळाले असल्याने त्यांची स्थिती अधिक चांगली आहे. 214 इलेक्टोरल
व्होट मिळवणाऱ्या ट्रम्प यांच्यापेक्षा बिडेन यांना तब्बल 50 इलेक्टोरल व्होटची आघाडी मिळाली आहे. त्याशिवाय बिडेन यांना ट्रम्प यांच्यापेक्षा पॉप्युलर व्होटदेखील अधिक मिळाले आहेत.
यंदाच्या निवडणूकीत अध्यक्ष बघून मतदान करण्यापेक्षा राज्य पातळीवरील समस्यांच्या अनुषंगाने मतदारांनी मतदान केले आहे. प्रत्येक राज्यातील इलेक्टोरल व्होटची संख्या लोकसंख्येनुसार वेगवेगळी असल्यामुळे राज्यातील आघाडी महत्वाची ठरली आहे.
अध्यक्षपदासाठी 270 इलेक्टोरल व्होटचा टप्पा गाठण्यासाठी बिडेन यांना जॉर्जिया, पेनसिल्वेनिया, नॉर्थ कॅरोलिना आणि नेवाडा या राज्यांमधील अणखी केवळ 4 इलेक्टोरल व्होट मिळवणे बाकी आहे.
जॉर्जियामध्ये 16. पेनसिल्वेनियामध्ये 20, नॉर्थ कॅरोलिनामध्ये 15 आणि नेवाडामध्ये 6 इलेक्टोरल व्होट आहेत.