पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि पवार कुटुंबातही फूट पडलेली नाही. आमच्या कुटुंबात जे काही होतं, त्याला प्रायव्हसीचा अधिकार आहे. मला, शरद पवार, रोहित पवारांना तो अधिकार नाही. मात्र, आमच्या उर्वरित कुटुंबीयांना प्रायव्हसीचा अधिकार आहे.
त्यामुळे आमच्या कुटुंबात, कौटुंबिक वेळात ज्या काही गोष्टी होतात त्या अर्थातच सांगता येणार नाहीत. असे राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरदचंद्र पवार) खासदार सुप्रिया सुळे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
अजित पवार तर आमच्यात फूट पडल्याचे स्पष्ट म्हणत आहेत. त्यावर काय सांगाल? असा प्रश्न सुप्रिया सुळे यांना विचारण्यात आला. त्यावर त्यांनी कुणी कसं वागावं हा त्याचा वैयक्तिक प्रश्न असतो, असे सुळे यांनी सांगितले.
ही लोकशाही आहे आणि लोकशाहीत चर्चा झाली पाहिजे. आपण आपले प्रोफेशनल आणि प्रायव्हेट आयुष्य मिक्स करु शकत नाही. तेवढी वैचारिक प्रगल्भता आपल्यात आलेली पाहिजे, असे मतही त्यांनी मांडले आहे.
देश आणि राज्य लोकशाहीकडून दडपशाहीकडे जात आहेत. राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असताना सभागृहाच्या गॅलरीमध्ये मंत्री आणि आमदारामध्ये भांडण होतात. यापेक्षा अधिक काय गलिच्छ असू शकते, असा टोलाही सुळे यांनी लगावला आहे.