पुणे {प्रभात वृत्तसेवा} – केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ आणि राज्य शिक्षण मंडळांकडून मान्यता असलेल्या सर्व ओपन स्कूलमधून म्हणजेच मुक्त शाळेतून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना आता नीट परीक्षेसाठी बसता येणार आहे. ओपन स्कूलमधून बारावी उत्तीर्ण झालेले उमेदवार नीट परीक्षेला बसण्यास पात्र असतील व त्यास राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाद्वारे मान्यता दिली जाईल, असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. त्यामुळे ओपन स्कूलमधील विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.
मेडिकल कौन्सिल ऑफ इंडिया रेग्युलेशन ऑन ग्रॅज्युएट मेडिकल एज्युकेशन 1997 च्या नियमन 4(2) (अ) च्या तरतुदीने अशा उमेदवारांना परीक्षेत बसण्यास मनाई होती. दिल्ली उच्च न्यायालयाने 2018 मध्ये ही तरतूद घटनाबाह्य ठरवत रद्द केली होती. दरम्यान, वैद्यकीय शिक्षण मंडळाने 02.11.2023 रोजी एक पत्र जारी केले होते.
त्यानुसार केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ आणि राज्य शिक्षण मंडळांनी मान्यता दिलेल्या सर्व ओपन स्कूलला नीटच्या उद्देशाने राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने मान्यता मिळण्यासाठी विचार केला जाईल, असे पत्रात नमूद करण्यात आले होते. त्यानुसार आयोगाने पदवीधर वैद्यकीय शिक्षण नियमावली २०२३ तयार केली आहे. त्यात उमेदवार आवश्यक विषयांसह बारावी उत्तीर्ण झाला असेल, तर नीट परीक्षा बसण्यास पात्र राहणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले.
दरम्यान, मुक्त शाळा ही एक लवचिक शैक्षणिक पद्धत आहे. यात विद्यार्थ्यांना त्यांच्या वेळापत्रकानुसार त्यांच्या प्रगतीचे मूल्यांकन करताना स्वत: शिकण्याची परवानगी देते. त्यासाठी स्वतंत्र बोर्ड आहेत. त्याद्वारे विद्यार्थी घरी बसून अथवा काम करूनही शिक्षण घेता येतो. असे विद्यार्थी आता नीट परीक्षेला बसू शकणार आहेत.
भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र अथवा जैवतंत्रज्ञान आणि इंग्रजी विषयांसह नीटसाठी उपस्थित राहण्यास पात्र असेल. म्हणून पदवीधर वैद्यकीय शिक्षण नियमावली 2023 तयार केल्यानंतर पदवीधर वैद्यकीय शिक्षणावरील पूर्वीचे नियम 1997 विविध सुधारणांसह याद्वारे रद्द करण्यात आले आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर न्यायालयाने हा निर्णय दिला आहे.