सरकार स्थापनेला नजीकचा मुहूर्त नाहीच!

पुढील महिन्याच्या प्रारंभी नवे सरकार येणार असल्याचे शिवसेनेचे सूतोवाच

मुंबई : महाराष्ट्रात सरकार स्थापन करण्याविषयीच्या हालचालींचे केंद्र मुंबईहून दिल्लीला हलले आहे. मात्र, सत्तेची चाचपणी करण्यासाठी सुरू असलेल्या चर्चाप्रक्रियेला अजूनही वेग आल्याचे दिसत नाही. त्यामुळे सरकार स्थापनेला लवकर मुहूर्त मिळण्याची चिन्हे धूसर बनली आहेत.

सरकार स्थापनेसाठी शिवसेना, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस हे तीन पक्ष एकत्र येऊन नवी आघाडी बनवतील, अशी शक्‍यता काही दिवसांपासून बळावली. त्यानंतर त्यांच्यात बैठकांचे सत्रही सुरू झाले. मात्र, त्यातून फार काही हाती आले नसल्याचेच सध्याचे चित्र आहे.

त्यातूनही कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या बैठकीतून सरकार स्थापनेविषयीचा मार्ग सुकर होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. मात्र, सोमवारी दिल्लीत झालेल्या त्या महत्वपूर्ण बैठकीनंतर कोंडी फुटण्याऐवजी सस्पेन्स आणखीच वाढला. सोनियांबरोबरच्या भेटीत सरकार स्थापनेविषयी चर्चाच झाली नाही, अशी राजकीय गुगली पवार यांनी नंतर पत्रकारांशी बोलताना टाकली. त्यामुळे शिवसेनेचे टेन्शन वाढल्याची चर्चा सुरू झाली.

शिवसेनेशी हातमिळवणी करण्याच्या मुद्‌द्‌यावर चर्चा करण्यासाठी दिल्लीत मंगळवारी कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक होणार होती. मात्र, माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या जयंतीमुळे ती बैठक रद्द करण्यात आली. आता ती बैठक बुधवारी होणार असल्याचे समजते.

एकीकडे सत्तावाटपाचे सूत्र निश्‍चित करताना शिवसेनेला बॅकफुटवर नेण्यासाठी कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी मुद्दाम वेळकाढूपणा करत असल्याची चर्चा सुरू झाली आहे. तर दुसरीकडे वेगवेगळ्या विचारसरणींच्या पक्षांना एकत्र येताना पूर्ण सावधपणे पाऊले उचलावी लागणार असल्याने विलंब लागणार असल्याचे समर्थनही केले जात आहे.

पुढील महिन्याच्या प्रारंभी सरकार स्थापन होईल, असे सूतोवाच शिवसेनेच्या गोटातून करण्यात आले आहे. मात्र, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी अजूनही पत्ते खोलण्यास तयार नसल्याने संभ्रमावस्था कायम राहिली आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)