उरुळी कांचन, (वार्ताहर)- उरुळी कांचनजवळील शिंदवणे (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीत दोन चोरट्यांनी एकाच रात्रीत तीन ठिकाणी घरफोड्या करून मुद्देमाल पळवून नेल्याची घटना उघडकीस आली आहे.
गुरुवारी (दि. ७) मध्यरात्री एकच्या सुमारास ही घटना घडली आहे. यामध्ये घरामध्ये चोरटे प्रवेश करतानाचा सीसीटीव्ही व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण आहे.
दत्तात्रेय रघुनाथ महाडिक (रा. शिंदवणे, ता. हवेली), असे चोरी झालेल्या घरातील व्यक्तीचे नाव आहे. आणखी दोन ठिकाणी चोरी झाली असून, त्यांची नावे समजू शकली नाहीत. मिळालेल्या माहितीनुसार, दत्तात्रय महाडिक हे शिंदवणे परिसरात कुटुंबासोबत राहतात. गुरुवारी संध्याकाळी ते हडपसर याठिकाणी गेले असता चोरट्यांनी कुलूप तोडून घरात प्रवेश केला. साहित्य व कपाटातील साहित्य अस्ताव्यस्त केले.
दरम्यान, महाडिक हे हडपसर या ठिकाणावरून येऊन घरात पाहणी केली असता कपाटात ठेवलेले दोन तोळ्याचे दागिने दिसले नाहीत. त्यांनी घरातील सीसीटीव्ही फुटेज पाहिले असता दोन चोरटे तोंडाला रुमाल बांधून घरात घुसल्याचे सीसीटीव्हीत दिसून येत आहेत.