उरुळी कांचन, (वार्ताहर)- हैद्राबाद येथील एकास व्यवसाय करण्यासाठी स्वस्तात बकऱ्या विकत घेवून देण्याच्या बहाण्याने लुटणाऱ्या आंतरजिल्हा टोळीला स्थानिक गुन्हे (ग्रामीण) शाखा व उरूळी कांचन पोलिसांनी तिघांना बेड्या ठोकल्या आहेत.
अमोल काढण भोसले (वय ३२, रा. कोळगाव पांढरेवाडी ता. श्रीगोंदा जि. अहमदनगर), शिवा पैदास ऊर्फ सुरेश चव्हाण वय १९, रा. वेठेकरवाडी ता. श्रीगोंदा जि. अहदनगर) व श्याम पैदास ऊर्फ सुरेश चव्हाण वय २३ वर्षे रा. वेठेकरवाडी ता. श्रीगोंदा जि. अहदनगर), अशी अटक केलेल्या तिघांची नावे आहेत. अशी माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांनी दिली.
हैद्राबाद येथील एकास व्यवसाय करण्यासाठी स्वस्त दरात बकऱ्या घेवून देतो असे सांगून ऊरुळी कांचन येथे बोलावून घेवून त्यास व साथीदारांना बकऱ्या दाखविणेसाठी शेताकडे नेले. त्या ठिकाणी त्यांना मारहाण करून त्यांच्याजवळील रोकड 5 लाख रुपये, मोबाइल, गळयातील चेन असा 5 लाख 83 हजार रुपयांचा मुद्देमाल जबरीने चोरून नेला होता. याबाबत अब्दुला लालबादशाह शेख यांनी उरूळी कांचन पोलिसांत फिर्याद दिली होती.
गुन्हयाचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पथकामार्फत चालू असताना हा गुन्हा रेकॉर्डवरील गुन्हेगार अमोल भोसले याने त्याचे साथीदारांचे मदतीने केला असल्याचे समजले.
तपासात संशयित गुन्हेगार भोसले हा साथीदारांसोबत लोणावळा परिसरात आल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. तिघांना सापळा रचून ताब्यात घेतले. दरम्यान, त्यांच्याकडे कसून चौकशी केली असता त्यांनी गुन्हा केल्याचे सांगितले. भोसले यांचे विरुध्द पुणे ग्रामीण, अहमदनगर जिल्हयात दरोडा, जबरी चोरी, घरफोडी चोरीचे एकूण ९ गुन्हे दाखल आहेत.
ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, ऊरळी कांचन पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शंकर पाटील, स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक राहुल गावडे, पोलीस उपनिरीक्षक अमित सिदपाटील, सुधीर पाडुळे, सचिन घाडगे, दीपक साबळे, अजित भुजबळ, विक्रम तापकीर, योगेश नागरगोजे, राजु मोमीन, अतुल डेरे, बाळासाहेब खडके, मंगेश भगत, अक्षय नवले, निलेश सुपेकर, दगडू वीरकर यांनी केली आहे. पुढील तपास उरुळी कांचन पोलीस करीत आहेत.