उरुळी कांचन, (वार्ताहर)- कुत्र्याने चावा घेतल्याने उपचारासाठी गेलेल्या तरुणाला चक्क ‘सिस्टर’ नसल्याचे कारण देत उरुळी कांचन येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्याने उपचार नाकारल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याबाबत वैद्यकीय अधिकारी शुभम आवारे यांनी सिस्टर नसल्याने उपचार करू शकत नाही, असे लेखी उत्तर दिल्याने अधिकाऱ्याविषयी तीव्र संताप व्यक्त होत आहे.
रुग्णाला पोलिसांची भीती दाखवत तुझ्यावर कारवाई करेल, अशी दमदाटी केल्याने ‘उलटा चोर कोतवाल को डाटे’ अशी अवस्था उरुळी कांचन आरोग्य केंद्राची झाली आहे. आदेश श्रीहरी राक्षे (वय २१, रा. इरिगेशन कॉलनी, उरुळी कांचन, ता. हवेली), असे उपचारासाठी आलेल्या रुग्णाचे नाव आहे. शुभम आवारे असे उपचार नाकारलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्याचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आदेश राक्षे यांना मंगळवारी (दि.5) रस्त्याने जाताना कुत्रा चावला होता. त्यामुळे त्यानी बुधवारी कामाला न जाता उरुळी कांचन येथील सरकारी दवाखान्यात इंजेक्शन घेण्यासाठी सकाळी दहा वाजता गेले होते.
दवाखान्यात गेले असता त्या ठिकाणी रेबीज हे इंजेक्शन नसल्याचे शुभम आवारे यांनी राक्षे यांना सांगितले. बाहेरुन इंजेक्शन घेऊन या असे सांगितले. त्यानुसार उन्हात जाऊन राक्षे यांनी इंजेक्शन व काही इतर साहित्य घेऊन रुग्णालयात आले. यावेळी राक्षे यांनी आवारे यांना इंजेक्शन देण्याची विनंती केली. यावेळी वैद्यकीय अधिकारी आवारे डॉक्टर हे ‘इन्स्टाग्राम’वर रील्स पाहण्यात दंग होते. त्यावेळी त्यांनी सिस्टर नाहीत, तुम्ही उद्या इंजेक्शन घ्या, असा सल्ला दिला.
राक्षे यांनी विनंती केली. मात्र, आवारे यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही. सिस्टर नसल्याने मी तुला इंजेक्शन देऊ शकत नसल्याचे लेखी दिले. हा प्रकार राक्षे याने उरुळी कांचनचे माजी सरपंच संतोष कांचन व जिल्हा नियोजन समितीचे सदस्य अलंकार कांचन यांना सांगितला.
कामचुकारांवर कारवाई करा- कांचन
दरम्यान, अलंकार कांचन व संतोष कांचन यांनी जाऊन विचारपूस केली असता हे अधिकारी टोलवाटोलवीची उत्तरे देत होते. या डॉक्टरवर कारवाई करण्याची मागणी अलंकार कांचन यांनी केली आहे. वैद्यकीय अधिकाऱ्यावर वैद्यकीय तालुका अधिकारी काय कारवाई करणार, याकडे परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.