नगर, (प्रतिनिधी) – नेवासा तालुक्यातील मुकींदापुर येथे घरफोडीकरणारे दोघे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केले आहे. तसेच चोरीचे सोने घेणारा ज्योर्तिंलिंग ज्वेलर्सचा मालकही या गुन्ह्यात सह आरोपी करण्यात आला आहे.
आकाश ऊर्फ ताकसाहेब छगन काळे (वय २२, रा. आंतापुर, ता. गंगापुर, जि. छत्रपती संभाजीनगर), कुनत्या बंडु भोसले (वय २५, रा. बाबरगांव, ता. गंगापुर, जि.छत्रपती संभाजीनगर), यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून २८ हजार रुपये किमतीचे ४ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने मिळून आले.
त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता अभिष छगन काळे (फरार) व गुंड्या डिचार्ज काळे (फरार) दोन्ही रा. आंतापुर, ता. गंगापुर, जि. छत्रपती संभाजीनगर) यांनी मिळून नेवासा फाटा परिसरात दिवसा घरफोडी केली असल्याचे तपासात पुढे आले.
तसेच आरोपींनी नेवासा फाटा, ता. नेवासा, कारेगांव, ता. श्रीरामपूर व घारगांव, ता. संगमनेर येथे घरफोडी केल्याचे उघड झाले. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना मिळालेल्या माहितीनुसार हा गुन्हा आकाश छगन काळे याने केला असून तो सोन्याचे दागिने विक्री करण्यासाठी प्रवरासंगम, ता. नेवासा येथे बस स्टॅण्ड येथे येणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली.
त्यानुसार गुन्हे शोध पथकाने मिळालेल्या माहितीनुसार सापळा रचवून आरोपीस मोठ्या शिताफीने ताब्यात घेतले. ही कारवाई गुन्हे शाखेतील पोउपनि समाधान भाटेवाल, पोलीस अंमलदार दत्तात्रय गव्हाणे, रवींद्र कर्डिले, संदीप दरंदले, ज्ञानेश्वर शिंदे, देवेंद्र शेलार, भिमराज खर्से, फुरकान शेख, अमोल कोतकर, भाऊसाहेब काळे, किशोर शिरसाठ, चंद्रकांत कुसळकर व अरुण मोरे यांच्या पथकाने केली.